भोंगऱ्या बाजारातून घडले संस्कृतिचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:59 IST2020-03-06T11:58:46+5:302020-03-06T11:59:10+5:30
पारंपारिक नृत्याने सर्वांचे वेधले लक्ष, लाखोंची झाली उलाढाल

भोंगऱ्या बाजारातून घडले संस्कृतिचे दर्शन
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : आदिवासी बांधवासाठी आनंदाची पर्वणी असणाºया भोंगºया उत्सवास मोठ्या थाटात सुरुवात झालेली आहे. या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव व तरुणाईने लोकगीत गायन, बासरी वादन व ढोल वादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित आहे. बोराडी येथे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात आदिवासी बांधवाची गर्दी दिसून आली. विशेषत: या बाजारात महिलांची लक्षणीय हजेरी दिसून आली़
५ रोजी बोराडी गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. त्यादिवशी हा भोंगºया बाजार भरला़ उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भोंगºया बाजारात आप-आपली दुकाने थाटण्यासाठी निरनिराळ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या दुकानासाठी जागा उपलब्ध करून घेतल्या होत्या.
बाजार समितीच्या उपबाजार आवारापासून ते पानसेमल रस्त्यापर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत गाडगे महाराज नगर, साने गुरूजी नगर, बसस्थानक आवार आणि रस्त्याच्या दुतर्फावर विविध विके्रत्यांनी दुकाने थाटली होती. भोंगºया बाजाराच्या दिवशी गावातील वातावरण उत्साही दिसून येत होते.
सकाळी ११ वाजेपासूनच मालकातर, धाबापाडा, झेंडेअंजन तसेच परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते.
आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. गावाजवळच्या पाड्यातून येणाºया आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती.
तरूण-तरूणींनी खास आदिवासी पोषाख, काहींनी कमरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. डोंगर दऱ्यांमध्ये राहणाºया आदिवासींच्या डोक्यावर असलेल्या टोप्यांवर निरनिराळे प्राणी-पक्षांचे चित्र होती. पारंपारिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गितांचा सुरही आपल्या बासरीतून वाजवित होते. अनेक आदिवासी बांधव गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. बाजारामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. भोंगºया बाजार पहाण्यासाठी खास बाहेर गावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरूणींनी वस्त्रालंकार तसेच गृहपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. आदिवासी भागातील इतर भागापेक्षा बोराडी बाजार मोठ्या स्वरूपात भरला होता.
या बाजारात आदिवासी वर्षाला लागणारे संसारपयोगी वस्तु खरेदी करतात. यात गुळ, डाळ्या, गोडशेव, भांडी, खेळणी, साड्या, कापड, बेनटेक्स दागिने आदी वस्तुंची दुकाने थाटली होती. आदिवासी मोठ्या स्वरूपात बाजारातील वस्तु खरेदी करतात. सुमारे २० ते २२ लाखाची उलाढाल येथील बाजारात झाली. आदिवासी महिला हा धार्मिक सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. ढोलच्या तालावर नाच-गाण्याचा आनंद लहान-मोठे-थोर महिला-पुरूष घेत होते.
जि.प. अध्यक्षांचा सहभाग
बोराडी येथील भोंगºया बाजारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधेही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनीही मोठा ढोल वाजविला होता. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, सदस्य शामकांत पाटील, रमण पावरा, रवींद्र शिंदे, राज निकम आदी उपस्थित होते.
बोराडी गावाचा आठवडा बाजार हा गुरूवारी असतो. नेहमीच्या आठवडे बाजारापेक्षा आज मात्र इतर दिवसापेक्षा बाजार अधिक फुलला होता. सर्वच रस्ते गर्दीने फुललेले दिसत होते. होळी सणांसाठी लागणारा सामान व साहित्यांची खरेदी आदिवाासी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसत होते. पारंपारिक पध्दतीचे लागणारे कपडे व दाग-दागिन्यांच्या दुकानासह लहान मुला-मुलींसाठी व स्वत:साठी कपडे त्याचबरोबर होळी सण साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सामानांची व वस्तुंचे दुकाने ही विक्रीसाठी सज्ज होते. ठिकठिकाणी पान दुकाने लागली होती. दिवाळी सणासारखा कुटुंबातील सर्व लहान थोर आबाल वृध्द हा सण उत्साहाने साजरा करतात. एवढेच नाहीतर सालदारी वा रखवालदारीसाठी बिगर आदिवासी भागात असलेले पावरा लोक हा सण साजरा करण्यासाठी आपापल्या गावी परतलेले आहेत. त्यातूनच त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे.