मालपूर धरणात अत्यल्प पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:39+5:302021-09-08T04:43:39+5:30
मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता ...

मालपूर धरणात अत्यल्प पाणीसाठा
मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती व नाई नदीवरील संगमावर पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती धरण बांधण्यात आलेले आहे. त्या काळी या नद्यांना बारमाही पाणी असायचे. सध्या या नद्या कोरड्या आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास, धरण भरते हे दोन वर्षांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. नैसर्गिक परिस्थिती बघता, परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात अमरावती व नाई नदीला मोठा पूर येतो. मात्र, या वर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाचा होत असल्यामुळे धरणात अद्याप जलसाठा झालेला नाही.
यामुळे धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत या वर्षी भरलेले नाही. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अशीच परिस्थिती तालुक्यातील वाडी शेवाडी, धरणांची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी होताना दिसून येत आहे. मालपूरसह तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस होऊन धरणे अद्यापपर्यंत निम्मेही भरलेली नाहीत. मुसळधार पाऊस न झाल्यास, येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील या मध्यम प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा जमा झालेला नाही. विशेषत: बहुतांशी सर्व प्रकल्प कोरडेच आहेत.
मालपूरसह परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मालपूर धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता ६.७६ दलघमी असताना, आतापर्यंत या पावसाळ्यात २२२ मी. पाण्याचा साठा म्हणजेच २८ टक्के पाण्याने भरले आहे. या धरणाची सर्वोत्तम पाणीपातळी २२५.७० मीटर असल्याचे सांगितले जाते.
पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. त्यानंतर, पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमजू लागली होती. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली होती. अशा वेळी येथून आवर्तन सोडण्यात आले होते.
दरम्यान, पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांसाठी विहिरींना पाणी असणे गरजेचे आहे. आगामी काही दिवसांत अजून दमदार पाऊस झाला, तरच विहिरींनाही पाणी येईल, अन्यथा त्याचा परिणाम रब्बीच्या हंगामावर होऊ शकेल.