कापूस खरेदी केंद्राला वाहनांचा गराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:06 IST2020-02-27T13:05:56+5:302020-02-27T13:06:32+5:30
चिमठाणे-शिंदखेडा रस्ता बंद : बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, प्रवाशी, वाहन चालक त्रस्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शिंदखेडा कापूस खरेदी केंद्रावर हजारो वाहनांची गर्दी झाल्याने चिमठाणे- शिंदखेडा रस्ता बंद झाला आहे. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रवासी, वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
खरेदी केंद्र बंद होण्याची वार्ता
शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर रेल्वे स्टेशनजवळील वर्धमान जिनिंगमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात आहे. तालुक्याला हे मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीस आणला जातो. त्यात २५ तारखेच्या रात्री संपूर्ण तालुक्यात कापूस खरेदी बंद होणार असल्याची वार्ता पसरल्याने तालुक्यातून रात्रीतून व पहाटेपर्यंत जिनिंग परिसरात रस्त्यावर दोन्ही बाजूने कापूस भरलेली हजारो वाहने व बैलगाडी दाखल झाल्या. यामुळे सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.
चार किलोमीटरचा फेरा
कापूस भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याने शिंदखेडा-चिमठाणे रस्ता सकाळी ११ वाजेपर्यंत संपूर्ण बंद झाला होता. ११ वाजता पोलीस आले. त्यांनी रस्ता वळण रस्ता काढला. त्यामुळे नाहक कुमरेज व परसामळ असे ४ किलोमीटर अंतर फिरून या रस्त्यावर यावे लागत होते. सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ होती.
विद्यार्थ्यांची केविलवाणी स्थिती
सध्या बारावीची परीक्षा सुरू असून संपूर्ण रस्ता कापसाच्या वाहनांनी बंद केल्यामुळे चिमठाणेकडून येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी परीक्षेसाठी स्टेशनजवळून अक्षरश: रडत-रडत पळत होते. त्यात काही शेतकऱ्यांनी शहरात फोन केला. त्यानंतर खाजगी वाहनाने काही विद्यार्थांना मिनिडोअर चालकांनी सोडले.
काहीही बोलण्यास नकार
दरम्यान, कापूस खरेदी बंद होणार का, एवढी गर्दी होऊन रस्ता बंद झाला तरी याचे नियोजन का करण्यात आले नाही, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी येथील ग्रेडरची प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र, कोणत्याही प्रकारे माध्यमांशी बोलण्यास वरिष्ठांनी मज्जाव केला असून ११ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत औरंगाबाद येथील सीसीआयचे अधिकारी उमंग व दास यांच्याशी दूरध्वनीवरुन अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आॅपरेटरने माध्यमांचे नाव ऐकून फोन बाजूला काढून ठेवला. यामुळे कापूस खरेदी खरच बंद होणार कि सुरु राहणार, हे समजू शकले नाही.
ऐन परीक्षेच्या काळात संपूर्ण रस्ता दिवसभर बंद असल्याने सायंकाळी लहान मुलांच्या शाळेच्या वाहनाचेही हाल झाले. शेवटी सर्व वाहने कुमरेज-परसामळ गावाला वळसा मारून, ४ किलोमीटर फिरून परत रस्त्यावर येत होती. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांची वाहने सुरळीतपणे लावण्याचे नियोजन तात्काळ करणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीसीआयच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह
सीसीआयचे अधिकारी प्रसार माध्यमांपासून काय लपवित आहेत. प्रसार माध्यमांना काहीही माहिती न देण्यामागील कारण काय आहे. सीसीआयचे औरंगाबाद येथील अधिकाºयांनी अशी कोणती माहिती दडविण्यासाठी सर्व ग्रेडरला लेखी ताकीद दिली आहे.
सरकारने खुलासा करावा
दरम्यान, आघाडी सरकार हे शेतकºयांचे सरकार आहे, असे मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री ठासून सांगत आहेत. मग कापूस खरेदी बंद करणार कि सुरू ठेवणार, याबाबत खुलासा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. तसेच शेतकºयांना अडचणीत का आणत आहेत, असा सवालही कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आला.
कापूस खरेदी बेमुदत बंद
दरम्यान, कापूस खरेदीचा साठा जिनिंग प्रेसिंगच्या ओट्यावर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे व कापसाच्या गाठी ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्यामुळे २७ फेब्रुवारीपासून सीसीआय कापूस खरेदी करणार नाही, असे सीसीआय केंद्रप्रमुखांनी कळविले आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र बेमुदत बंद राहणार असल्याने तिन्ही केंद्रावर शेतकºयांनी माल आणू नये, असे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी जाहीर सूचना पत्रकाद्वारे शेतकºयांना आवाहन केले आहे.