गरजुंना भाजी-पोळी, तर निराधारांना दिले जाते घरपोच भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:39+5:302021-05-05T04:58:39+5:30
दोंडाईचातील काही समाजसेवी संस्थांनी तसेच वैयक्तिक, सामूहिकरीत्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत गरजूंना अन्नधान्य, जेवण, किराणाची मदत केली. परंतु कोरोनाच्या ...

गरजुंना भाजी-पोळी, तर निराधारांना दिले जाते घरपोच भोजन
दोंडाईचातील काही समाजसेवी संस्थांनी तसेच वैयक्तिक, सामूहिकरीत्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत गरजूंना अन्नधान्य, जेवण, किराणाची मदत केली. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत गरजूंना मदत करताना कोणी दिसत नसून मदतीचा ओघ आटला आहे. परंतु या विपरीत परिस्थितीतही जनसहयोग रोटी बँकेने गरजू, निराधार यांना अन्न पुरविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. २३ जुलै २०१७ पासून म्हणजे तब्बल ४५ महिन्यांपासून जनसहयोग
रोटी बँक गरजू, निराधार, भिकारी अशा ४० जणांना दररोज २ पोळ्या व भाजी मोफत देत आहे. स्टेशन भागातील गोपाल हॉटेलजवळ दररोज संध्याकाळी ५ वाजता अन्नवाटप केले जाते. हुसेनभाई विरदेलवाला, डॉ. मुकुंद सोहोनी व त्यांच्या सहकाऱ्यांंच्या संकल्पनेतून सदर योजना सुरू आहे.
.कोणी रात्री उपाशी झोपू नये, जो त्या वेळी आला तो आपल्यासाठी भुकेला, या संकल्पनेतून वाटप होत असल्याचे हुसेनभाई यांचे म्हणणे आहे.
दररोज ४० गरजू, निराधार, भिकारी याना अन्न पॅकेट दिले जात असले तरी कोरोना काळात १०० जणांना अन्न पॅकेट वाटप करण्यात आलेत. सदर योजना सरकरसाहेब रावल, शहरातील काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने चालवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे-अनेक जण लग्नाच्या वाढदिवशी, स्वतःचा वाढदिवशी, नातेवाईकाच्या गंधमुक्तीच्या दिवशी स्वतः या केंद्रात येऊन अन्नदान करतात. या दिवशी या गरजूंना गोडधोड वाटप केले जाते. जनसहयोग रोटी बँकेमार्फत आमरस-पुरणपोळीचे वाटप केले जाते. या कोरोनाच्या काळात सुमारे ५१ जणांनी या गरजूंना आमरस-पुरणपोळीचे जेवण दिले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी-स्वर्गीय डॉ. पी. व्ही. सोहोनी यांच्या पत्नी कमल सोहोनी यांच्या तेराव्याचा दिवशी- जनसहयोग रोटी बँकेमार्फत त्यांचा मुलगा-डॉ मुकुंद सोहोनी व सून अनुराधा सोहोनी यांनी काल कोरोनाच्या काळात गरजू, भिकारी यांना आमरस-पोळीचे जेवण दिले. त्या वेळी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद भाव टिपण्यासारखा होता.
जनसहयोग रोटी बँक २ ऑगस्ट पासून -वयोवृद्ध, निराधार, ज्यांचे कोणीच नाही अशा लोकांना अशा ३५ जणांना अन्नाचे डबे देत आहे. या योजनेमुळे एका अपंग महिलेसह दोन जणांना रोजगारही मिळाला आहे.