रोग नियंत्रणासाठी ‘आशा’ होताहेत अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 22:21 IST2020-03-02T22:21:17+5:302020-03-02T22:21:40+5:30
असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम : उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी प्रशिक्षण, व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा आता अपडेट होत आहेत़ आतापर्यंत माता आणि बालकांच्या आरोग्यावर काम करणाºया आशा स्वयंसेविका ह्दयविकार, मधुमेह, कर्करोग यांसारख्या प्रदिर्घ आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी सज्ज होत आहेत़
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात सन २०१७ पासून असांसर्गि रोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे़ या कार्यक्रमात आता आशा स्वयंसेविकांना प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले आहे़ त्यासाठी आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे़
येथील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरीक संघात धुळे तालुक्यातील मुकटी आणि शिरुड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत काम करणाºया ६० आशा स्वयंसेविकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबीर सुरू आहे़ आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ़ पी़ आऱ पवार, आरोग्य सहाय्यक एस़ आऱ पाटील, ए़ एच़ माने, व्ही़ डी़ शेवाळे, एस़ व्ही़ शिवदे, व्ही़ आऱ वाघ आदी प्रशिक्षण देत आहेत़ आरोग्य विभागातर्फे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण मोहिम राबवली जात आहे़
उच्च रक्तदाब, ह्दयविकार, मधुमेह, लखवा, किडणीचे आजार, मानसिक विकार, अपघातामुळे झालेल्या जखमा, गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, मिर्गी, दमा, अस्थमा आणि श्वसन संस्थेचे विकार या असांसर्गिक आजारांना नागरीकांनी कसा प्रतिबंध करावा याचे प्रशिक्षण दिले जात आहे़ अशा प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची ओळख कशी करणे, त्यांना उपचारासाठी सहकार्य करणे या महत्वाच्या मुद्यांचा प्रशिक्षणात समावेश आहे़
मागील दहा वर्षात भारतामध्ये माता आणि बालकांच्या आरोग्यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे़ यामध्ये प्रामुख्याने आरोग्य संस्थेतील प्रसुतीच्या प्रमाणात वाढ, नियमित लसीकरणात झालेली वाढ, नवजात शिशु आणि बालकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा, मातामृत्यू आणि अर्भक मृत्यू प्रमाणात घट झाली आहे़ यात आशा स्वयंसेविकांचे मोठे योगदान आहे़
आतापर्यंत माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाºया आशांना आता सांसर्गि रोगांविषयी देखील प्रशिक्षण दिले जात आहे़ संवाद व समुपदेशन कौशल्य, समाजासोबत तडजोडीचे कौशल्य, तळागळातील व दुर्लक्षित समुहा पर्यंत पोहोचण्याचे कौशल्य व ज्ञान त्यांना अवगत केले आहे़ याशिवाय हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग सारख्या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणामध्ये देखील आशांनी यशस्वी सहभाग दिला आहे़ परंतु आरोग्य सेवेच्या क्षेत्रात नवनविन आव्हाने समोर उभी आहेत़ मधुमेह आणि ह्दयरोगाचे प्रमाण खुप वाढले आहे़ या आजारांना नागरीकांनी कसा प्रतिबंध करावा, आजार होवू नये यासाठी काय काळजी घ्यावी, आजारांची लक्षणे कोणती, आजार झाला तर उपचार कुठे आणि कसे करावे याबाबत जनजागृती करण्यासाठी आशा सज्ज होत आहेत़ या असांसर्गिक आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जनजागृती आणि समाजात जाणिवा निर्माण करण्याचे ज्ञान त्यांना दिले जात आहे़ या राष्ट्रीय कार्यक्रमात कार्यक्षेत्रातील नागरीकांना झालेल्या आजारांचे निदान करण्याची आणि त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे, आजारास कारणीभुत असलेल्या कारणांची माहिती कुटूंबांना देणे, नागरीकांना आजारापासून वाचविण्यासाठी सल्लामसलत करण्याची महत्वाची जबाबदारी आशांवर आहे़
समाजात कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे़ तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अति सेवनामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते़ त्यामुळे तंबाखुमुक्तीसाठी, व्यसनमुक्तीसाठी देखील आशा काम करणार आहेत़
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही़ निरोगी जीवनासाठी नियमीत व्यायाम, चांगला आहार याचे महत्व आशा पटवून देणार आहेत़