स्थानकात लालपरी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:11+5:302021-08-27T04:39:11+5:30
धुळे : येथील बसस्थानकाचे आवार प्रशस्त आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसचे चालक जागा मिळेल त्या ठिकाणी बस कुठेही ...

स्थानकात लालपरी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप!
धुळे : येथील बसस्थानकाचे आवार प्रशस्त आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसचे चालक जागा मिळेल त्या ठिकाणी बस कुठेही लावत असल्याने, प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय.
सध्या रक्षाबंधनानिमित्त जादा बस सोडल्या आहेत. त्यामुळे येथील आगारात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगावकडे जाणाऱ्या बसगाड्या लावण्यासाठी व्यवस्था आहे. त्या त्याच ठिकाणी लागतात. मात्र, बसची गर्दी वाढल्यानंतर चालक स्थानकात जागा मिळेल तिथे बस उभी करतात. अनेकदा बस निघून जाते तरी प्रवाशांना कळत नाही. यात ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे जास्त हाल होत असतात. ग्रामीण भागातील बसला पाट्या नसतात. त्यांची उद्घोषणा होत नाही. बस लागते आणि निघून जाते. यामुळे शिस्त निर्माण होण्याची गरज आहे, तरच प्रवाशांना बससेवेचा फायदा होऊ शकेल.
प्रवासी म्हणतात...
नाशिक, मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या बस व्यवस्थित फलाटाला लागतात. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बस चालक कुठेही लावतात. काही बसला पाट्याही नसतात. त्यामुळे गोंधळ होतो. अशातच बस निघून जाते.
-सरला पाटील
प्रवासी
ग्रामीण भागात जाणाऱ्या बस फलाटाला लागत नाहीत. स्थानकात जागा मिळेल तिथे उभ्या केल्या जातात. त्यांची उद्घोषणाही होत नाही. त्यामुळे बस येते केव्हा, जाते केव्हा याचा थांगपता लागत नाही.
-विनायक सोनवणे,
प्रवासी
चालकांना सूचना देण्याची गरज
प्रवासी बसच्या वेळेतच स्थानकात दाखल होत असतात. मात्र, बस जागा मिळेल त्या ठिकाणी उभी करण्यात येत असल्याने, प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे चालकांना सूचना देण्याची गरज आहे.