बाबरे गावात जवानांचे अनोखे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:17 IST2020-02-22T23:16:42+5:302020-02-22T23:17:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात सतरा वर्षे सेवा देवून निवृत्त होत गावात परतलेल्या दोन जवानांचे अनोख्या ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात सतरा वर्षे सेवा देवून निवृत्त होत गावात परतलेल्या दोन जवानांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले़ बाबरे येथील ग्रामस्थांनी रक्तदान करुन या जवानांचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला़ यावेळी संकलीत झालेले ४५ रक्तदात्यांचे रक्त हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला देण्यात आले़
धुळे तालुक्यातील बाबरे गावातील गोविंदसिंग रौंदळे व दीपक जाधव हे दोन जवान नुकतेच भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले़ गोविंदसिंग यांनी आर्मी मेडिकल कोअर म्हणून कारगिल द्रास सेक्टर जम्मू व काश्मीर, पणजी गोवा, आर्टिलरी तोफखाना युनिट आसाम हिमाचल प्रदेश येथे व कमांड हॉस्पिटल कलकत्ता नंतर कमांड हॉस्पिटल पुणे अशी १७ वर्षे अविरत सेवा बजावली़ तसेच दीपक जाधव यांनी आर्टिलरी रेजिमेंट पठाणकोट, फरीदकोट पंजाब, त्यानंतर कुपवाडा जम्मु काश्मीर येथे दुर्गम डोंगर रांगेत, उधमपुर जम्मु येथील असंवेदनशील परिस्थितीत व शेवटी मथुरा उत्तर प्रदेश अशी सतरा वर्षे सेवा पूर्ण केली़ दोन्ही मातृभूमीची सेवा करुन एकाच दिवशी घरी आल्याबद्दल गावातील तरुणांनी रक्तदान करून अनोख्या पध्दतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला़ विशेष म्हणजे या दोन्ही जवानांनी देखील रक्तदान केले़ त्यानंतर दोघा जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली़
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते़ यात ४५ तरुणांनी रक्तदान केले़ रक्तदान शिबीरासाठी डॉ़ राजेश ठाकूर , चंदुलाल साठे, रवींद्र पवार, अरुण चौधरी, राजू कुलकर्णी, राजू महाडिक, दीपक कासार यांनी सहकार्य केले़ रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ़ दरबारसिंग गिरासे, गणेश गर्दे यांनी केले़ यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, आमदार कुणाल पाटील यांचे रुग्णसेवक गोकुळ राजपूत, तुषार गर्दे, संजय भालेकर, संभाजी भालेकर, आनंदा मोरे, आनंदा गायकवाड उपस्थित होत़े कार्यक्रमाचे आयोजन खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष राजपूत, निंबा राजपूत, अमोल राजपूत, धोंडू राजपूत यांच्यासह आदिवासी तरुणांनी केले होते़