अज्ञात टँकर चालकाने नाल्यात सोडले केमिकल, नदीचे पाणी दूषित, नेर गावाचा पाणीपुरवठा चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:44+5:302021-09-15T04:41:44+5:30
नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत ...

अज्ञात टँकर चालकाने नाल्यात सोडले केमिकल, नदीचे पाणी दूषित, नेर गावाचा पाणीपुरवठा चार दिवस बंद
नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत पोहोचल्याने नेरसह भदाणे गावाचा पाणीपुरवठा दूषित होऊन जीवघेणा ठरला आहे. ही बाब सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी जात असताना विजय श्रीराम, युवराज खताळ, आर. डी. माळी, सतीश बोढरे, कृष्णा खताळ आदींच्या लक्षात आल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला कळवले. सरपंचांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही गावांचा पाणीपुरवठा चार दिवसांसाठी बंद केला आहे. धुळे येथील प्रयोग शाळेतून पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नेर जवळून जाणाऱ्या नवे भदाणे महामार्गालगत असलेल्या नाल्यात सोमवारी रात्री एक टँकरचालक टँकरमधील केमिकल टाकून पसार झाला. त्यानंतर हे केमिकल नाल्यातून वाहत जाऊन पुढे पांझरा नदीत आले. या नदीच्या काठावरच नेर आणि भदाणे गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणीही केमिकलयुक्त झाले आहे. तर नदीतील पाणी ही केमिकलयुक्त झाले आहे. मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले दिसून येत आहेत. ही बाब नेर व भदाणे ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. त्यामुळे गुरांना आणि नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ गावात दवंडी देऊन नागरिकांना नदीत गुरांना पाणी पाजू नये तसेच महिलांनी कपडे आणि धुणीभांडी करण्यासाठी नदीवर जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान, टँकर चालकाने असा प्रकार का केला, याचे कारण गुलदस्त्यात आहे.
मात्र महामार्गावर गॅस आणि केमिकल टँकरचा काळाबाजार चालू असतो. हे या आधीही उघड झाले आहे. त्यामुळे कदाचित अशा प्रकारातून हा प्रकार घडला असावा असा नागरिकांकडून अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठवले
नेर ग्रामपंचायतीने लगेच पाणीपुरवठा कर्मचारी देवीदास जाधव, मांगू मोरे, पंकज चौधरी, ईश्वर चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक हर्षल मोरे, राकेश जाधव यांना विहिरीच्या पाण्याचे नमुने घेऊन ते धुळे येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे याचा अहवाल आल्यानंतरच गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यासाठी चार दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
-गायत्री संजय जयस्वाल, सरपंच, नेर