रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:09 IST2020-02-02T23:08:21+5:302020-02-02T23:09:15+5:30
आयएमएची कार्यशाळा : राज्यातील ३० जिल्ह्यातीलप्रतिनिधींचा सहभाग

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इंडियन मेडीकल असोसिएन महाराष्ट्र राज्य आणि धुळे शाखेतर्फे ‘मेडीको लिगल अॅसपेक्ट’ या विषयावर आयोजित महा एमएलकॉन या डॉक्टरांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर एकमत झाले़ रविवारी दुपारी या कार्यशाळेचा समारोप झाला़
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी तसेच देशातील १३ राज्यांचे राष्ट्रीय प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चर्चासत्रात मार्गदर्शन केले़ एनएमसीच्या डॉक्टर विरोधी धोरणाच्या विरोधात जनजागृती अभियानाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला़ येत्या १२ मार्च रोजी साबरमतीला देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले़
डॉ़ शिवकुमार उत्तुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतेही उपचार अथवा शस्त्रक्रीया करताना रुग्णाची संमती घेणे डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे़ शस्त्रक्रिया करताना आणखी एखादी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास त्यासाठी देखील संमती घ्यावी़ भुलतज्ज्ञांनी देखील स्वतंत्र संमती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़
डॉ़ दिनेश ठाकरे यांनी शासनाशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि नोंदीबाबत मार्गदर्शन केले़ विविध शासकीय योजना, विमा, जन्म नोंद याबाबतीत डॉक्टरांनी अपडेट असले पाहिजे़ डॉ़ नवरंगे यांनी देखील डिलीजंट मॅनेजमेंट आॅफ डेथ इन हॉस्पिटल या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टरांनी कागदोपत्री सुरक्षित राहण्याच्या मुद्यावर भर दिला़
डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध, रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, वैद्यकीय सेवा देत असताना अत्याधुनिक रुग्णालय व रोग मिमांसा यांची सांगड घालून पारदर्शकता आणणे आदी महत्वाच्या विषयांवर उहापोह झाला़ वाढते आजार व अपघातांमुळे रुग्णसेवा देत असताना अनेक प्रकारचे समज व गैरसमज निर्माण होतात व त्याचा परिणाम रुग्णालयांवर तसेच डॉक्टरांवर हल्ले होतात़
देशभरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना कायदेशिर बाबींना सामोरे जावे लागते़ न्याय वैद्यक शास्त्राशी निगडीत अनेक समस्या निर्माण होतात़ या सर्व समस्यांवर काय उपाययोजना करता येतील या बाबतीत चर्चासत्रात देशभरातील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले़