एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:59 IST2021-03-15T20:59:40+5:302021-03-15T20:59:50+5:30
अपघात : दोन वेगवेगळ्या घटना

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडसह सरवड ते लामकानी रस्त्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघाताच्या घटना या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दोन्ही अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
चाळीसगाव रोडवरील अपघात
एमएच १८ एमए ०९६४ क्रमांकाच्या दुचाकीने संतोष चोरसिया हा भाईजी नगरात असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होता. शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोडच्या क्रॉसिंगजवळ सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमएच १३ सीयू ७४९२ क्रमांकाची बीडकडून धुळ्यातील बसस्थानकाकडे येणाऱ्या बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो रस्त्यावर फेकला गेला. बसच्या चाकाखाली आल्याने तो फरफटत गेला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत त्याची आई वर्षा चोरसिया (५८) या देखील होत्या. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मदत करुन जखमी आणि मृत तरुणाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाली असता उपमहापौर कल्याणी अंपळकर या देखील पोहचल्या होत्या. शंभर फुटी रोडवर गतिरोधकाची मागणी त्यांनी केली.
लामकानी रस्त्यावरील घटना
धुळे तालुक्यातील लामकानीकडून सरवडकडे एमएच ११ बीएन ९२८० क्रमांकाच्या एसटी बसने सरवडकडून नंदाणे गावाकडे जाणारी एमएच १८ एव्ही १३४० क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार अनिल रतिलाल पाटील याच्या डोक्याला जबर मार लागला. परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात बसचालक जगदीश भास्कर वाघ (रा. कुसुंबा ता. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.