देवपूर पोलीस ठाण्यातील हिस्ट्रीशिटर शुभम राजेंद्र देशमुख याला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो शहर हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, राहुल गिरी, तुषार पारधी, कमलेश सूर्यवंशी, मयूर पाटील यांनी खासगी वाहनाने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास देवपुरातील जीटीपी स्टाॅपजवळ गेले असता शुभम देशमुख हा येथे उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेत प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी आहे का, अशी विचारणा केली. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेत देवपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, दुसरी कारवाई शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ऋषिकेश भांडारकर याला देखील हद्दपार करण्यात आले असताना देखील तो शहरातील देवपूर भागात बिनधास्तपणे फिरत होता. यासंदर्भातील माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून भांडारकर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करुन त्याच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस करीत आहेत.