ग्राहक बनून आलेल्या सशस्त्र लुटारुंनी धुळ्यात दोघा भावांना चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 16:02 IST2020-11-07T16:02:25+5:302020-11-07T16:02:59+5:30
२५ हजार घेऊन पोबारा

ग्राहक बनून आलेल्या सशस्त्र लुटारुंनी धुळ्यात दोघा भावांना चाकूने भोसकले
धुळे : चारचाकी टायर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा सशस्त्र लुटारुंनी दोघा व्यावसायिक भावांना चाकूने भोसकले. त्यांच्याकडे असलेली २५ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास मालेगाव रोडवरील तुलसी टायरजवळ घडली. जखमी अवस्थेत दोघा भावांनी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास दोघाविरुध्द गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील बडगुजर कॉलनीत राहणारे रुपेश विठ्ठल चौधरी (४८) आणि राजेश चौधरी (५०) या दोघा भावंडाचे मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे शनीमंदिराजवळ तुलसी टायर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास रुपेश चौधरी हे दुकान बंद करत असताना ग्राहक बनून दोन जण त्याठिकाणी आले. चारचाकी वाहनाचे टायर विकत पाहीजे अशी मागणी केली. त्यावेळी दुकान बंद झाल्याचे या भावंडांनी सांगितले. दुकान उघडण्याचा दम यावेळी चौधरी बंधुना भरण्यात आला. त्यांनी विरोध करताच एका चोरट्याने राजेश चौधरी यांच्या हातातील २५ हजार रुपये रोकड असलेली पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. राजेश यांच्याकडून विरोध होत असल्याने दुसऱ्या चोरट्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हे पाहून रुपेश हे त्यांच्या भावाला वाचविण्यासाठी धावले असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांच्या पोटावर आणि हातावर चाकूने वार केल्यामुळे चौधरी बंधू जखमी झाले. तोपर्यंत हे दोन्ही चोरटे २५ हजाराची रोकड घेऊन पसार झाले.
जखमी अवस्थेत दोघा भावडांनी रुग्णालय गाठले आणि शहर पोलिसांना घटनेची माहिती कळविली. आपल्या मित्र परिवारांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश विठ्ठल चौधरी यांनी दाखल केलेल्या फियार्दीवरुन दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत.