ट्रकच्या धडकेत दोघ भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:46 IST2020-12-20T21:46:19+5:302020-12-20T21:46:59+5:30
वाघाडी फाटा : संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्तारोको

ट्रकच्या धडकेत दोघ भावांचा मृत्यू
सोनगीर : महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोघांना दुचाकीसह फरफटत नेल्याची घटना वाघाडी फाटा येथे रविवारी दुपारी घडली़ घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी एकत्र येत गतिरोधकाच्या मागणीसाठी अर्धा ते पाऊण तास मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला़ दरम्यान, या अपघातात अण्णा सुकदेव सोनवणे (४०) हे जागीच ठार झाले़ तर त्यांचा भाऊ देविदास सुकदेव सोनवणे (४३) यांचा रुग्णालयात उपचार घेताना सायंकाळी मृत्यू झाला़ दोन्ही साक्री तालुक्यातील भडगाव वधार्ने येथील रहिवाशी आहेत़. दरम्यान जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या अपघातात चारजण ठार झाले आहेत.
अण्णा सोनवणे व देविदास सोनवणे हे दोघे भाऊ दुचाकीने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे दुचाकीने जात होते. त्याचवेळी शिरपूरहून धुळ्याकडेयेणाऱ्या ट्रकने (क्र. जीजे ०३ बीडब्ल्यू ९८८१) या क्रमांकाच्या दुचाकीला ( एमएच १५ सीए ३७५० ) जोरदार धडक दिली. यात अण्णा सोनवणे जागीच ठार झाले तर देविदास सोनवणे हे गंभीर जखमी झाले़ तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला़. दरम्यान वाघाडी फाट्यावर गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्गावर अधार्तास रास्तारोको आंदोलन केले. घटनास्थळी सोनगीर पोलिसांनी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ वाघाडी फाट्यावर दोन दिवसात गतिरोधक बसविण्याचे काम केले जाईल असे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले़
अपघात प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालक संजय लालजी यादव (२७, रा़ मांडवा, जिल्हा जौनपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्याला पोलिसांनी अटक केली आहे़