बसच्या धडकेने दोन दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 12:02 IST2017-06-11T12:01:54+5:302017-06-11T12:02:15+5:30
चिमठाणे ते दराणे दरम्यान अपघात : बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

बसच्या धडकेने दोन दुचाकीस्वार ठार
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि. 11 : सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावरील चिमठाणे ते दराणे दरम्यान खलाणेकडे जाणा:या कच्चा रस्त्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येणा:या मोटरसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात खंडू पुंजू पाटील (वय 49, रा. दोंडाईचा) व मागे बसलेला सतीश विनायक पवार (वय 25, रा. दराणे) हे दोघे जागीच ठार झाले. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
धुळ्याकडून दोंडाईचाकडे दोन एस. टी. बसेस एकापाठोपाठ जात होत्या. त्यात मागे असणा:या बसने (क्रमांक एम. एच. 20 बीएल 2303) पुढे चालत असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणा:या मोटरसायकलला (एम. एच. 18 ए. एफ. 0883) धडक दिली. त्यामुळे त्यावरील खंडू पाटील व सतीश पवार हे जागीच ठार झाले. ते चिमठाणे येथून दराणेकडे जात होते.
या प्रकरणी किशोर साहेबराव पवार यांच्या फिर्यादीवरून बसचालक जितेंद्र हिरामण सूर्यवंशी याच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.