नगाव शिवारातील जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:43 IST2021-09-04T04:43:08+5:302021-09-04T04:43:08+5:30
धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात राहणारे सुनील अर्जूनदास तलरेजा हे सोनगीरकडून धुळयाला येत होते. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ ...

नगाव शिवारातील जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक
धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात राहणारे सुनील अर्जूनदास तलरेजा हे सोनगीरकडून धुळयाला येत होते. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नगाव गावाजवळील दर्ग्याजवळ दोन तरुणांनी त्यांना थांबविले. काहीतरी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले. धाक दाखवून त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये रोख आणि ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने काढून पोबारा केला होता. या घटनेची फिर्याद त्यांनी २७ ऑगस्ट रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात त्यांनी नोंदविली होती. तपास सुरु असताना संशयावरुन मास्तर उर्फ किरण बालू सोनवणे (२३, रा. चांदसे ता. शिरपूर) आणि धुळ्यातील गोंदूर रोडवरील होमगार्ड ऑफीसच्या समोर इंदिरा नगर, लक्ष्मी चौकात राहणारा सोन्या उर्फ सुनील वामन पारधी (२३) यांंना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक याेगेश राजगुरु व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, कर्मचारी मुक्तार शेख, किरण जगताप, किरण कोठावदे, परशुराम पवार, रमाकांत पवार, सुनील राठोड, निलेश हालोरे यांनी कारवाई केली आहे.