धुळ्यात सव्वादोन लाखांचे फर्निचर चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:37 IST2020-08-06T21:36:52+5:302020-08-06T21:37:10+5:30
साक्री रोडवरील मॉल फोडले : मुख्य रस्त्यालगत चोरी झाल्याने आश्चर्य

dhule
धुळे - शहरात फर्निचरच्या एका मॉलमध्ये मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपये किंमतीचे फर्निचर चोरुन नेले आहे़ शहर पोलीस ठाण्यापासून जवळच साक्री रोडवरील मॉलमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
धुळे शहरातील साक्री रोडवर कुमारनगरलगत असलेल्या राहूल कॉम्प्लेक्समध्ये डिझायर फर्निचर मॉल आहे़ या मॉलमध्ये ४ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजेपासून ते ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान म्हणजे ४ आॅगस्टच्या मध्यरात्री ही चोरी झाली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली़
चोरट्यांनी फर्निचर मॉलचे मागील दरवाजाचे कुलूप हॅक्सा ब्लेडने कापून मॉलमध्ये प्रवेश केला आणि मॉलमधील सुमारे २ लाख २७ हजार ९०० रुपये किंमतीचे फर्निचर चोरुन नेले़
चोरीला गेलेल्या फर्निचरमध्ये १६ हजार, १४ हजार, १८ हजार, १५ हजार आणि १३ हजार ५०० रुपये किंमतीचे पाच टिपॉय, ६ हजार ५०० रुपये, ५ हजार, ५ हजार ८००, ७ हजार २००, ३ हजार ५००, ४ हजार २००, ४ हजार ७०० आणि ४ हजार ५०० रुपये किंमतीचे आठ चप्पल स्टॅण्ड तसेच १८ हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, ७० हजार रुपये किंमतीचा मोठा सोफा, १२ हजार रुपये किंमतीचे सहा सीसीटीव्ही कॅमेरे आणि १० हजार रुपये किंमतीच्या ४ क्विंटल वजनाच्या लोखंडी सळया इत्यादी साहित्याचा समावेश आहे़
चार आॅगस्टला रात्री ही चोरी झाली़ ५ आॅगस्टला सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे राहुल बाळकृष्ण सोनवणे यांनी मॉल उघडला त्यावेळी मॉलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तात्काळा पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली़
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ दरम्यान, उपविभागी पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली़
याप्रकरणी मॉलचे मालक राहुल बाळकृष्ण सोनवणे (४९, रा़ १९ प्रोफेसर कॉलनी, देवपूर धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ या चोरीचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ तिगोटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़