अपूर्ण काम झालेल्या पुलावरुन खाली कोसळला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:20 IST2020-06-06T22:19:44+5:302020-06-06T22:20:13+5:30
सुदैवाने चालक बचावला : अजंग-फागणे दरम्यानची घटना

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मुकटी : महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद असून पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. ३ रोजी रात्रीच्या सुमारास वादळी पावसात वळण रस्ता न दिसल्याने ट्रक या पुलावरुन खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालक बचावला.
सुरत - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अजंग-फागणे गावादरम्यान पंचवटी पुलाजवळ ३ जून रोजी रात्री आठ वाजता जळगावहून मुंबईकडे जाणारा एम.एच. ०४ ई.वाय. ४१० क्रमांकाचा ट्रक अजंगजवळ वळण रस्ता न दिसल्याने थेट महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद असलेल्या पुलाखाली जाऊन कोसळला. या अपघातात चालक सुरेंद्र चव्हाण (३८, रा. महाबलपूर जि.मऊ (उत्तर प्रदेश) हा सुदैवाने किरकोळ जखमी झाला.
१५ दिवसापूर्वीही घडली घटना
दरम्यान, याचा पुलाखाली १५ दिवसापूर्वी टँकर देखील अपघातग्रस्त होऊन पडले होते.
प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग धुळे यांनी महामार्गाची पाहणी करुन वळण रस्ता व अपघातग्रस्त ठिकाणी दिशादर्शक फलक स्पष्ट दिसतील, असे लावावेत. तसेच सूरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावेत, अशी मागणी मुकटी जिल्हा परिषद सदस्या मंगला पाटील, विशाल पाटील, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे.