आश्रमशाळांमध्ये वृक्षारोपण; गरजूंना खावटी किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST2021-08-12T04:40:50+5:302021-08-12T04:40:50+5:30
धुळे : जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यालयातर्फे सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ...

आश्रमशाळांमध्ये वृक्षारोपण; गरजूंना खावटी किटचे वाटप
धुळे : जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यालयातर्फे सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात धुळे कार्यालयाने तयार केलेल्या ‘आदि गौरव’ पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. याशिवाय याहामोगी मातेच्या प्रतिमेसह आदिवासी समाजातील क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि खावटी किट वाटप या कार्यक्रमांचा समावेश होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे धुळे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मुलांचे वसतिगृह, धुळे येथे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते, तर मुलींच्या वसतिगृहात आमदार डॉ.फारुक शाह यांच्या हस्ते धुळे शहरातील लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांसह संबंधित गावांचे सरपंच उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते याहामोगी देवीच्या प्रतिमेचे अनावरण व पूजन करण्यात आले. त्यानंतर, मुलांच्या वसतिगृहात दहावी, बारावीच्या वर्गात कला व विज्ञान शाखेतून धुळे प्रकल्पात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच आश्रमशाळेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी धोडमिसे यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी जानगर, ठाकरे, बागुल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धोडमिसे म्हणाल्या की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. या विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोलाचे कार्य आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन धोडमिसे यांनी केले. याशिवाय धुळे प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी रोपांची जोपासना करावी, असे आवाहन धोडमिसे यांनी केले.