धुळ्यातील पाच वेडसर व्यक्तींवर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:47 IST2018-07-07T22:43:07+5:302018-07-07T22:47:15+5:30
मिशन - न्याय सर्वांसाठी उपक्रम : अव्याहतपणे सुरु राहणार मोहीम, जे़ ए़ शेख यांची माहिती

धुळ्यातील पाच वेडसर व्यक्तींवर उपचार!
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनोरुग्णाना सन्माने जीवन जगण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या हितासाठी धुळे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत ‘मिशन - न्याय सर्वांसाठी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याअंतर्गत ५ जणांना धरुन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करत त्यांना ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश जे़ ए़ शेख यांनी दिली़
भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांपैकी जीवन जगण्याचा अधिकार हा सर्वात श्रेष्ठ अधिकार असून नागरीकांना सन्मानाने जीवन जगता यावे याकरीता महत्वपूर्ण तरतूद संविधानात केली गेलेली आहे़ त्याअंतर्गत धुळ्यात न्याय सर्वांसाठी हे मिशन राबविण्यास सुरुवात झाली आहे़ समाजात बरेचसे मानसिक रुग्ण, निवाराहिन, अर्धनग्न अवस्थेत फिरताना दिसून येतात़ अशांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे़ राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण दिल्ली यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण मुंबई अंतर्गत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाने सध्या मानसिक रुग्ण व मानसिक विकलांग व्यक्तींकरीता विधी सेवा योजना राबविली जात आहे़ सदर योजनेतंर्गत जिल्हा विधी प्राधीकरणाचे सचिव जे़ ए़ शेख यांच्या संकल्पनेतून ‘मिशन - न्याय सर्वांसाठी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ या उपक्रमानुसार धुळे शहरात रस्त्यावर निवाराहीन, अर्धनग्न अवस्थेत फिरणाºया मनोरुग्णांना सुरक्षितपणे घेऊन विधी स्वयंसेवकांमार्फत स्वच्छता करुन संबंधित पोलीस स्टेशनला कायद्यानुसार मिसींग रिपोर्ट दाखल केला जात आहे़ एवढेच नव्हेतर मनोरुग्णांना न्यायालयापुढे हजर करुन प्राथमिक चौकशी तसेच वैद्यकीय अहवालाचे आधारे मानसिक उपचाराची आवश्यकता भासत असल्यास पुढील प्रभावी उपचार व आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे़
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व मनोरुग्णाला न्यायालयात मोफत कायदेशीर सहाय्य मिळण्यासाठी विधी सेवा प्राधीकरणाच्यावतीने अॅड़ विनोद बोरसे यांची नेमणूक करण्यात आली आहे़ विशेष पथकात सहायक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह राजेंद्र सुर्यवंशी, निलेश पाटील, वसंत पाटील, भाईदास साळुंखे, कुणाल दाभाडे, मुकुंदा जगताप या पोलीस कर्मचाºयांचा पथकात समावेश आहे़ मनोरुग्णांच्या स्वच्छतेसाठी धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे, रत्ना मोरे, पवन खरात, इम्रान शेख या स्वयंसेवकांची पथकाला मदत होत आहे़