प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:42+5:302021-01-21T04:32:42+5:30
धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त भत्त्यापासून वंचित
धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोरोना काळात अहोरात्र रुग्णसेवा केली आहे. मात्र, त्यांना त्यासाठीचा अतिरिक्त भत्ता न मिळाल्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ५० डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून डॉक्टरांनी कोविड विभागातील काम बंद केले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता.
कोरोनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत होती. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आंतर्वासिता करीत असलेल्या डॉक्टरांनी कोरोना काळात कोविड विभागात सेवा दिली होती. त्यासाठी त्यांना अतिरिक्त भत्ता देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, नुकताच अतिरिक्त भत्त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडून फेटाळण्यात आला असल्याने अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
संघटनेचा दावा - संघटनेने दावा केला आहे की, २२ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याउलट अर्थ मंत्रालयाने अतिरिक्त भत्ता देण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या अस्मी या संघटनेने दिली.
अतिरिक्त भत्ता न दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड विभागातील काम थांबविले आहे. मागणी मान्य न झाल्यास नॉन कोविड विभागातीलही काम बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
- राहुल गायकवाड, संयुक्त सचिव अस्मी संघटना धुळे