वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:32+5:302021-01-23T04:36:32+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, ...

वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, फक्त कमलाबाई चौकात नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत अद्यापही ते सुरू झालेले नाहीत.
शहरातील बारा पत्थर रोडवर सारखी वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी चाळीसगा, अमळनेरकडून येणाऱ्या बसगाड्या, तसेच मालेगावकडून येणारी वाहने, त्याचबरोबर दुचाकी वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यातच याच ठिकाणी भंगार बाजार आहे. लोखंड घेऊन या बाजारात एखादे मोठे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबलकच रांगा लागतात. त्यातच दुचाकीस्वार मध्येच वाहने टाकत असल्याने, वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने, अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. अशा रस्त्यावरून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढी कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी ना वाहतूक सिग्नलची व्यवस्था आहे, ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहनधारकच कसे तरी वाहन काढून कोंडीतून मार्ग काढत असतात.
हीच परिस्थिती शहरातील इतर वर्दळीच्या चौकातही कायम आहे. शहरातील ठरावीक दोन-चार चौक सोडले तर कुठेही वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही की, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना ‘राम भरोसे’वाहने चालवावे लागतात.
रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असताना किमान या अभियानाच्या कालावधीत शहरातील वर्दळीच्या चौकात सुरळीत व सुलभ वाहतूक होईल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शासकीय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत राहील; मात्र रस्त्यावरची कोंडी कायम राहील हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत.