टॉवर उद्यानाचे सुशोभिकरण प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:27 IST2019-07-03T22:26:52+5:302019-07-03T22:27:12+5:30
महापालिका : वर्षभराअखेर उद्यानाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प

सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाचे सुरू असलेले काम.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ऐतिहासिक टॉवर उद्यानाचे सुशोभिकरण काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे़ टॉवर उद्यानासाठी ३ कोटी ९८ लाख ५४ हजार २४ रुपायांचा निधी मिळाला आहे़ सध्या या उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे़
शहरातील बारापत्थर रस्त्यावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल उद्यान या तब्बल १४७ वर्षे जुन्या ऐतिहासिक उद्यानाचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. १४७ वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटीशकालिन उद्यानात ५६़५ फूट उंच टॉवर असून त्यामुळे हे उद्यान ‘टॉवर गार्डन’ म्हणून प्रसिध्द आहे़
स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामकरण सरदार वल्लभभाई पटेल असे करण्यात आले. या उद्यानाच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकही आहे़ परंतु गेल्या ३० ते ४० वर्षात तत्कालीन नगरपालिका व विद्यमान महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या उद्यानाची अवस्था बकाल झाली होती.
त्याठिकाणी असलेली खेळणी, कारंजे, लहान मुलांसाठी असलेली रेल्वे यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांनीही त्याकडे पाठ फिरवली होती. या उद्यानांमध्ये लहान मुलांना घेवून जाणेही पालक उत्सूक नसत. तुटलेल्या खेळण्यामुळे दुखापतीचीही शक्यता नाकारता येत नव्हती. शासनाकडून उद्यानासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता़ वर्षभरानंतर या उद्यानाचे काम पुर्णत्वास येणार आहे़