धुळे जिल्हयातील ६४ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:59 IST2020-02-04T11:58:44+5:302020-02-04T11:59:12+5:30
टंचाई निवारण्यासाठी ८९ उपाय योजना प्रस्तावित,यावर्षी फक्त ४२ लाखांचा खर्च अपेक्षित

धुळे जिल्हयातील ६४ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता जवळपास कमीच आहे. मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा निरीक्षण अहवाल आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सर्वेक्षणानंतर प्रशासाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यात जानेवारी ते जून २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४ गाव व २५ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते. त्यासाठी ४२ लाखाचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता एस.बी.पढ्यार यांनी दिली.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५३१.६५ मी.मी आहे. मात्र गेल्यावर्षी आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस झाला. यावर्षी जवळपास सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सर्वच नद्या, विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील गाव, वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता खूपच कमी आहे.
तरीही जिल्हा परिषद प्रशासनातर्फे संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केलेला असून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.
टंचाईचे तीन टप्पे
दरवर्षी पाणी टंचाईचे तीन टप्पे करण्यात येत असतात. यात आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्यानुसार आराखडा सादर करण्यात येत असतो. मात्र गेल्यावर्षी दमदार पाऊस झाल्याने, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकाही गावाला पाणी टंचाईची झळ बसली नाही.
टंचाईच्या दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एकाच गावाला पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.
मात्र एप्रिल ते मे २०२० या कालावधीत जिल्ह्यातील ६३ गावे व २५ वाड्यांमध्ये पाणी टंचाई भासू शकते, असे आराखड्यात नमूद केलेले आहे. यात धुळे तालुक्यातील १५ गावे, साक्री तालुक्यातील १५ गावे २१ वाड्या, शिरपूर तालुक्यातील १७ गावे ३ वाड्या, व शिंदखेडा तालुक्यातील १७ गावे एक वाडीचा समावेश आहे.
८९ उपाययोजना प्रस्तावित
आगामी काळात जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी ८९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ४८ लाखांचा खर्च येणे अपेक्षित आहे.