धुळे जिल्ह्यातील चिमठावळ येथे तीन भावंडाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:44 IST2020-02-24T11:43:37+5:302020-02-24T11:44:12+5:30
मृतांमध्ये दोन सख्खे तर एक चुलत भाऊ

धुळे जिल्ह्यातील चिमठावळ येथे तीन भावंडाचा विहिरीत बुडून मृत्यू
सोनगीर (जि.धुळे): शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील तीन भावंडांचा विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास उघडकीस आली. तीन पैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता़ गौरव लिलाधर जाधव (१७), दीपक लिलाधर जाधव (११) व दीपक ज्ञानेश्वर जाधव (१५) असे मयतांची नावे आहेत.
चिमठावळ येथील गौरव व दोन्ही दीपक हे तिघेजण रविवारी सायंकाळी चारवाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने गौरवचे काका शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना ते दिसून आले नाही. पण विहीरीपासून काही अंतरावर शेतात सायकली उभ्या असलेल्या त्यांना दिसून आल्या. संशय आल्याने त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले तेव्हा पाण्यावर एकाची चप्पल तरंगताना दिसून आली. ते धावतच गावात आले. त्यांनी गौरव व दीपकचे वडील लिलाधरला ही घटना सांगितली. त्यांचे नातेवाईक मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी विहिरीत उतरून एक एक करीत तिघांना बाहेर काढले. तीनही मयत मुलांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
गौरव हा अकरावीला येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. त्याचा लहान भाऊ दीपक हा येथील आनंदवन माध्यमिक विद्यालयात सहावीचा विद्यार्थी होता. चुलतभाऊ दीपक हा सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता.
दीपकचे वडील लिलाधर जाधव हे येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असून दररोज जा ये करायचा व मुलांना शाळेत घेऊन यायचा. त्यांना दोन मुले असून. ते दोघेही मयत झाले. तर दुसºया दीपकचे वडील ज्ञानेश्वर जाधव हे बांधकाम ठेकेदाराकडे काम करतात. त्यांना दीपक हा एकुलता मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही परिवार गरीब कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे चिमठावळ गावावर शोककळा पसरलेली आहे.