जिल्ह्यात तीन मुलींना पळविले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:20+5:302021-08-20T04:42:20+5:30
धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमधून तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना गेल्या चोवीस तासांत घडल्या आहेत. याप्रकरणी ...

जिल्ह्यात तीन मुलींना पळविले,
धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमधून तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना गेल्या चोवीस तासांत घडल्या आहेत. याप्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. धुळे शहरालगतच्या अवधान गावात निंबानगर बेघर वस्तीमधून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मीक सुरेश बोरसे (रा. निंबानगर, बेघर वस्ती, अवधान) याच्याविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मिर्झा करीत आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावातूनदेखील एक १७ वर्षे १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी मंगळवारी पहाटे २.३० वाजेपासून बेपत्ता आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊनही सापडली नसल्याने तिला कुणीतरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तिच्या नातेवाइकांना आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, शिंदखेडा पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी अज्ञात संशयिताविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेडकाॅन्स्टेबल निंबाळे करीत आहेत.
धुळे शहरात साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील विशाल काॅलनीतून एक मुलगी बेपत्ता आहे. मूळचे मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्याच्या बनीहारमधील आदिवासी कुटुंब धुळ्यात रोजगारानिमित्त आले आहे. या कुटुंबातूनच सदर मुलगी सोमवारी रात्री ९ वाजेपासून बेपत्ता झाली आहे. आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाइकांकडे शाेध घेऊनही तिचा तपास न लागल्याने तिला कुणीतरी पळवून नेले असावे, असा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. त्यानुसार दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राेहिणी जाधव करीत आहेत.