लळींग धबधब्यात तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:34 IST2020-06-22T22:34:03+5:302020-06-22T22:34:29+5:30

दोघांचे मृतदेह सापडले : तिसऱ्याचा शोध सुरूच

Three drowned in Laling waterfall | लळींग धबधब्यात तिघांचा बुडून मृत्यू

लळींग धबधब्यात तिघांचा बुडून मृत्यू

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्यानजिक लळींग येथील धबधब्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ सायंकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरु असल्याने दोघांचे मृतदेह हाती लागले़ एकाचा शोध घेण्याचे काम अंधारामुळे थांबविण्यात आले़ तिघांपैकी एक अमळनेर तालुक्यातील पडासदळे गावातील आहे़
मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यानजिक लळींग येथील लांडोर बंगला परिसरात धबधबा आहे़ या भागात बºयापैकी पाऊस झाल्याने धबधब्याला पाणी आले आहे़ पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ७ ते ८ मित्र एकत्र आले आणि त्यांनी लळींग धबधबा गाठला़ पाण्यात पोहत असताना त्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एका पाठोपाठ तिघे बुडाले़ मयतांमध्ये देवपुरातील जीटीपी स्टॉप परिसरातील अंबाजी नगरात राहणारा रोहित कोमलसिंग गिरासे (२०), अमळनेर तालुक्यातील पडासदळे येथील शुभम प्रेमराज पाटील (२०) यांचे मृतदेह सापडले. तर शुभम अनिल चव्हाण (रा़ अभियंता नगर, धुळे) याचा मृतदेह सापडलेला नाही़ अन्य ४ ते ५ जणं या दुर्घटनेत वाचले आहेत़ हा प्रसंग पाहून त्यांच्या मनाला जबदरस्त धक्का बसला असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी पोहचले़ त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली़
सेल्फीने घेतला बळी
पळासदळे येथील शुभम पाटील हा पवन पाटीलसोबत त्याच्या बहिणीच्या घरी शेंगा द्यायला गेला होता. पवनने आपल्या अभियांत्रिकीच्या मित्रांना लळिंगला बोलविले. धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असतांना तिघांचा पाय घसरला अशी माहिती मिळालेली आहे.
रोहितच्या जाण्याने अंबाजीनगर सुन्न
लळींग धबधब्यात बुडून मृत्युमुखी पडलेला रोहित गिरासे हा एकलुता असल्याने गिरासे कुुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला़ रोहितच्या अचानक जाण्याने तो राहत असलेल्या अंबाजी नगर सुन्न झाले़ शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील कोमलसिंग रामसिंग गिरासे हे गेल्या १० वर्षापुर्वी धुळ्यात स्थायीक झाले होते़ ते भाजीपाल्याचे एजंट असून कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचे रोहित ट्रेडींग कंपनीचे नावाचे दुकान आहे़ त्यांचा मुलगा रोहित हा घरात एकलुता होता़ अत्यंत मिळावू व शांत स्वभावाचा रोहित हा श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या विज्ञान शाखेत तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता़ त्याला एक बहिण असून तिने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे़ तिचा साखरपुडा झाला असून लग्न ठरलेले होते़ त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते़ अशातच ही दुर्घटना घडल्यामुळे आनंदावर एकप्रकारे विरर्जन पडले़ परिणामी अंबाजीनगर सुन्न झाले़

Web Title: Three drowned in Laling waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे