लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:53 IST2020-06-26T21:48:24+5:302020-06-26T21:53:44+5:30
देवपूर पोलिसात गुन्हा दाखल : संशयित तरुण पुण्याचा

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी
धुळे : लग्नाला स्पष्टपणे नकार दिलेला असतानाही तरुणीच्या नातेवाईकांना फोन करुन दबाव टाकणे, त्या युवतीची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करणाºया पुण्यातील तरुणाने धुळ्यातील तरुणीच्या अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली़
पुणे येथील विश्रांतवाडीतील राकेश अशोक पडवळ या संशयिताला सन २०१७ मध्ये लग्नास स्पष्टपणे नकार दिलेला असतानाही त्याने वेळोवेळी मुलींच्या आई-वडीलांसह नातलगांना फोन करुन हे लग्न लावून द्या, असे म्हणत आग्रह धरला़ शिवाय त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केली़ या तरुणीचे फेसबुक अकाऊंट तयार करुन तिची बदनामी केली़ तिच्या आई-वडिलांना वेळोवेळी फोन करुन धमकी देत पैशांचीही मागणी केली़ पैसे न दिल्यास मुलीच्या अंगावर अॅसिड टाकून तिचा जीव घेण्याचीही धमकी देण्यात आली़
गेल्या दोन वर्षापासून अधिक काळ सुरु असलेल्या या छळाबद्दल अखेरीस पीडित तरुणीने देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केले़ त्यानुसार, भादंवि कलम ३५४ (ड), ३८७, ५००, ५०७, ५०९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल झाला़
देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप हे घटनेचा तपास करीत आहेत़