धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार 'एमआयएम' पक्षाच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. यावरून आता एमआयएमने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतानाच प्रभाग ४ मध्ये एकाच वेळी हजारो मतदान कार्ड सापडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढला आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता, यावर आता चर्चांना उधाण आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. "हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारस्थान असू शकते," असा थेट आरोप एमआयएमने केला आहे. निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा साठा जमवण्यात आला असावा असा संशय एमआयएम च्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आयुक्तांकडे धाव आणि कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी तातडीने धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी सापडलेल्या मतदान कार्डांची माहिती प्रशासनाला दिली असून, यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. यावेळी इर्शाद जहागीरदार म्हणाले, "हा लोकशाही प्रक्रियेतील मोठा घोटाळा असू शकतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू." अशी भूमिका एमआयएमच्या नेत्यांनी घेतले आहे.