धुळ्यात हजारो भाविकांनी घेतले कालभैरवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:43 IST2019-11-20T11:43:07+5:302019-11-20T11:43:25+5:30
सकाळपासून मंदिरात भाविकांची झाली गर्दी, महाप्रसादाचे केले वाटप

धुळ्यात हजारो भाविकांनी घेतले कालभैरवाचे दर्शन
आॅनलाइन लोकमत
धुळे : येथे श्रीकालभैरव जयंती मंगळवारी उत्साहात साजरी झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीकालभैरवाचे दर्शन घेतले.
एकविरादेवी मंदिरात शमीच्या झाडाखाली पुरातन श्रीकालभैरव मंदिर आहे. कालभैरव जयंतीनिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता पूजापाठ, अभिषेक करण्यात आला. तसेच शहरातील पाच स्वामीसमर्थ सेवा केंद्रातर्फे सामूहिक कालभैरव अष्टकाचे पठन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ११ बटूक भैरवांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जळगावचे संजय वाणी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान कालभैरवांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची रिघ लागलेली होती. मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी कालभैरवांचे दर्शन घेतल्याची माहिती एकविरा देवी रेणुकामाता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली.
सिद्धेश्वर गणपती मंदिर
शहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिरातही कालभैरव जयंती साजरी झाली. यानिमित्त दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बाजरीची भाकरी, भरीत, मिरचीचा ठेचा, गुलगुले भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मनोहरलाल शर्मा यांनी कळविले आहे.