गावाजवळील भात नदी पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:39 IST2020-02-09T12:38:31+5:302020-02-09T12:39:11+5:30
कापडणे । महसूल विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : गावाजवळील भात नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी होत आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
२०१८ व २०१९ मधील उन्हाळ्यात कापडणे येथील ग्रामस्थांना तब्बल ८ ते ९ महिने पाण्यासाठी रात्रंदिवस वणवण भटकंती करावी लागली होती. त्यामुळे नदी पात्रातून होणाऱ्या वाळू चोरीमुळे पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे कापडणे गावाजवळील भात नदीपात्रातून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कापडणे ग्रामपंचायत व महसूल विभागाने वाळू तस्करांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
मागील उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात तब्बल ३० ते ४० दिवसानंतर ग्रामपंचायतीमार्फत नळांना १५ मिनिटे पाणी सोडण्यात येत होते. टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. पाणीटंचाईच्या काळात पाणी मिळविण्यासाठी दैनंदिन कामकाज सोडून ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत होती. यंदा जोरदार पावसामुळे भात नदीला तब्बल १५ ते २० वर्षांनंतर महापूर आला. यामुळे नदीपात्रात वाळूचे प्रमाण वाढले असून गावविहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, वाळू माफियांकडून राजरोसपणे भात नदीच्या पात्रातून तब्बल दीड ते दोन महिन्यापासून सर्रासपणे अवैधरित्या वाळू चोरी होत आहे. कापडणे परिसरातील तारबल्ली शिवारात लांब अंतरापर्यंत असलेल्या भात नदीपात्रातून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. मात्र, अद्याप यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे वाळूमाफियांची मुजोरी वाढलेली आहे. दररोज वाळूची अशीच वाहतूक सुरू राहिली तर थोड्याच दिवसात नदीपात्रात वाळू दिसणार नाही. ग्रामस्थांवर उन्हाळ्यात पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपणार आहे.
तारबल्ली शिवारातील भात नदीपात्रातून गेल्या दीड ते दोन महिन्यापासून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूची चोरी केली जात आहे. त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. सतत होणाºया वाळू उपशामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणार असून रब्बी व उन्हाळी खरीप हंगामातील पिके पाण्याविना सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तसेच भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. त्यासाठी वाळू उपसावर संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी.
-नानाभाऊ देवराम माळी, शेतकरी
कापडणेच्या भात नदीपात्रातून कोणीही अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरी करताना महसूल विभागाच्या पथकाला आढळून आल्यास तात्काळ १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड करुन संबंधित चोरट्यांवर व वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील.
-विजय पी बेहेरे, तलाठी, कापडणे
कापडणे गावातील भात नदीपात्रातून अवैधरित्या वाळुची चोरी होत असेल तर यासंदर्भात तक्रार करणाºयांना ३१०० रुपये ग्रामपंचायतमार्फत बक्षीस देण्यात येणार आहे व वाळू चोरी करणाºयाला ११ हजाराचा दंड करण्यात येणार आहे. यासंदर्भात यापूर्वी गावात दवंडी देण्यात आलेली आहे. तरीदेखील आता महसूल विभाग व तहसीलदारांना निवेदन देऊन वाळू माफियांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची ग्रामपंचायतीमार्फत मागणी करण्यात येणार आहे.
-जया प्रमोद पाटील, सरपंच कापडणे