दोंडाईचा येथील खूनप्रकरणी तिसऱ्या संशयिताला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 22:34 IST2021-04-06T22:33:33+5:302021-04-06T22:34:02+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अन्य फरार संशयितांचा शोध सुरू

दोंडाईचा येथील खूनप्रकरणी तिसऱ्या संशयिताला पकडले
धुळे : दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन गटांतील जमाव एकमेकांशी भिडल्याने झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील दोन संशयितांना नंदुरबार येथून अटक केल्यानंतर आता तिसऱ्या संशयिताला सोमवारी रात्री दोंडाईचा येथूनच अटक करण्यात आली़. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे़.
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटकेतील दोघांना सोडविण्यासाठी जमावाने दोंडाईचा पोलीस स्टेशनवर चाल करीत हल्ला केला. भरकटलेल्या जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत पोलिसांनाही मारहाण केली होती. जमावाने दोघा आरोपींना पळवून नेत असताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गोळीबार केला. त्यात दोनजणांना गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी दोन गटांतील जमाव एकमेकांना भिडला. त्यात शाहबाज शाह गुलाब शाह (वय ४५) यांचा मृत्यू झाला.
तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नंदुरबार येथे जाऊन हर्षल नरेंद्र चौधरी आणि हरिष मोहन कोळी (रा. दोंडाईचा) या दोन संशयितांना अटक केली. तपास सुरू असतानाच दोंडाईचा शहरातच लपलेला भूषण राजेंद्र पारधी या तिसऱ्या संशयिताला पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले़. त्याचा खुनातील सहभाग असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली़. खून प्रकरणात आता तीनजण अटकेत आहेत़.