कोरोनामुळे चोरटेही घरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:22+5:302021-04-30T04:45:22+5:30
सन २०२० च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग धुळे जिल्ह्यात सुरू झाला. तत्पूर्वी कठोर लाॅकडाऊन जाहीर झाले आणि सलग तीन ...

कोरोनामुळे चोरटेही घरबंद!
सन २०२० च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग धुळे जिल्ह्यात सुरू झाला. तत्पूर्वी कठोर लाॅकडाऊन जाहीर झाले आणि सलग तीन महिने संपूर्ण देश ठप्प होता. कोरोना आणि लाॅकडाऊनने ग्रासलेल्या या वर्षात चोरीच्या ३३४ गुन्ह्यांची नोंद जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली. सन २०१९ मध्ये चोरीच्या तब्बल ५१७ घटना घडल्या होत्या. या वर्षाच्या तुलनेत गेल्यावर्षी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये १८३ गुन्ह्यांची घट झाली आहे. तसेच चोरीचे गुन्हेही कमी झाले आहेत.
मागील दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी चोरीचे प्रमाण कमी आहे. चार महिन्यांत केवळ १६ चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसदफ्तरी आहे. एका वर्षाच्या तुलनेत हा आकडा समाधानकारक असला तरी भविष्यात काय घडेल ते सांगता येत नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. अशा परिस्थितीत आणखी १५ दिवस निर्बंध वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने सलग महिनाभर दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी बाजार मात्र ठप्प आहे. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक घटली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या धास्तीने चोरदेखील जीव मुठीत धरून बसले असले तरी काही प्रमाणात चोऱ्या मात्र होतच आहेत. मोटारसायकल चोरींचे सत्र सुरूच आहे. पोलीस यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार चोरटे करू शकतात. त्यामुळे पोलिसांना हे दुहेरी आव्हानदेखील पेलावे लागणार आहे.
बलात्कारही वाढले
कोरोनाचा संसर्ग आणि लाॅकडाऊनमध्ये बलात्काराच्या घटनादेखील वाढल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत बलात्काराच्या ९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शिवाय मुली पळविण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
खुनाच्या घटना वाढल्या
या काळात बेरोजगारी आणि रिकामटेकड्यांचे प्रमाण वाढले असून अवैध धंदेही वाढले आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या कलहामुळे खुनाच्या घटना वाढल्या आहेत. अवघ्या चार महिन्यांत जिल्ह्यात ८ खून झाले आहेत.