शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद मिळालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:46 IST2021-03-26T22:46:41+5:302021-03-26T22:46:58+5:30
सर्व व्यवहार सुरळीत : काॅंग्रेसचे जिल्हाभर जनआंदोलन, डाव्या आघाडीचाही पाठिंबा

शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद मिळालाच नाही
धुळे : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंदला धुळे शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. दुकाने, आस्थापना सुरु होत्या. जिल्ह्यात कोरोनामुळे जनता कर्फ्यू असलेल्या भागांमध्ये मात्र बंद होता. काॅंग्रेस पक्षासह डाव्या आघाडीने निदर्शने करुन भारत बंदला पाठिंबा दिला.
डाव्या आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, कामगार विरोधी, जनता विरोधी कायद्यांच्या विरोधात अखिल भारतीय संयुक्त किसान सभेने नवी दिल्ली येथे गेल्या ४ महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आतापर्यंत सुमारे ४०० शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. तरी देखील केंद्र सरकार कायदे मागे घेण्यास तयार नाही. तसेच वीज विधेयक संसदेत मंजुर झाल्यास ग्राहकांना दरवाढीचा फटका बसेल. भांडवलदारांना मात्र कमी दराने वीज देण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे, वनाधिकार कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करावी, सर्व अपात्र दावे पात्र करावे, पात्र दावेदारांच्या ताब्यातील ४ हेक्टरपर्यंतची वनजमीन दावेदारांच्या नावावर करावी यासह इतर मागण्या केल्या आहेत. निवेदनावर हिरालाल परदेशी, पोपटराव चाैधरी, एल. आर. राव, नथ`थू साळवे, वसंत पाटील, साहेबराव पाटील, शरद पाटील, राजेंद्र चाैरे, मदन परदेशी, हिरालाल सापे, जयसिंग माळी, दिपक सोनवणे आदींच्या सह्या आहेत.
धुळे शहर काॅंग्रेसने देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गायत्री जायस्वाल, डाॅ. दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, बाणुबाई शिरसाठ, भिवसन अहिरे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदखेडा येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, संचालक प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नगरसेवक उदय देसले, पांडुरंग माळी, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल माणिक, नगरसेवक दिनेश माळी, किसान सेल अध्यक्ष धनराज देसले, सरपंच विशाल पवार, सरपंच महेंद्र पाटील, विरेंद्र झालसे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, पंकज पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, हुसैन बोहरी उपस्थित होते
सर्वपक्षीय पाठिंबा
शिरपूर : शेतकरी आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. प्रशासनाला निवेदन देवून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना किसान सभेचे अध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा शेत मजूर युनियनचे अध्यक्ष अॅड़ संतोष पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन, अभिमन भोई, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरतसिंग राजपूत, अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, शिवसेना शहराध्यक्ष मनोज धनगर, शेतकरी विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन पाटील, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे, हेमराज राजपूत, प्रदिप चव्हाण, अर्जुन कोळी, उत्तमराव माळी, हिरालाल चौधरी, दिनेश पाटील, युवराज राजपूत, संजय पाटील, प्रेमकुमार चौधरी, भुपेश पाटील उपस्थित होते.