जिल्ह्यात आतापर्यंत ६६० कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, ऑनलाइन पोर्टलवर केवळ ६२४ मृत्यू दिसत आहेत. पोर्टलवर नोंद केल्यानंतर ते दिसण्यासाठी वेळ लागतो. त्याठिकाणी एकूण मृत्यूंची नोंद तत्काळ केली जाते.
मात्र, आकडेवारी अपडेट केल्यानंतर ती पोर्टलवर दिसण्यास उशीर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांच्या संख्येत तफावत दिसत असल्याची माहिती डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
तसेच आरोग्य विभागाकडील मृतांची आकडेवारी व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या कोरोना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृतांच्या संख्येत मोठी तफावत आहे. आतापर्यंत त्याठिकाणी ७९५ मृतांवर अंत्यसंस्कार झाले असल्याची माहिती मिळाली.
सर्वाधिक बळी ग्रामीण भागात -
आरोग्य विभागाकडील माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६६० कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४०४ मृत्यू ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत. तर, शहरातील २५६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
तर फटका बसू शकतो -
१ - प्रत्यक्षात मृत्यूंची संख्या जास्त असते, मात्र शासकीय पातळीवर कमी दिसत असल्याने उपाययोजना करताना त्याचा फटका बसू शकतो. त्यासाठी मृत्यूची नोंद लवकर होणे गरजेचे आहे.
२ - एखाद्या भागात रुग्णांची संख्या जास्त असेल व त्याची नोंद ठेवली गेली नाही, तर कंटेनमेंट झोन व इतर उपाययोजना करता येणार नाहीत. मात्र, नोंदी वेळोवेळी ठेवल्या तर उपाययोजना करण्यास मदत होते.
३ - एखाद्या विशिष्ट भागातील बाधित रुग्णांची किंवा मृत्यूची नोंद नसेल, तर त्या परिसरातील सर्वेक्षण होऊ शकत नाही. त्या परिसरातील संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग न झाल्याने संसर्ग वाढू शकतो.
पालिका वाॅर रूम -
- महानगरपालिकेत कोरोना वाॅर रूम करण्यात आली आहे. महानगरपालिकेने कोरोना बेडसाठी वेबसाइट व हेल्पलाइनदेखील सुरू केली आहे.
- कोणत्या रुग्णालयात किती बेड आहेत, किती रुग्ण दाखल आहेत व किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती याठिकाणी दिली जाते.
कोरोना मृत्यूंची नोंद याठिकाणी ठेवण्यात येत नसल्याची माहिती मिळाली.
जिल्हा परिषदेत वाॅर रूम नाही -
- जिल्हा परिषदेत कोरोना वाॅर रूम नाही. त्यामुळे तेथे कोरोना मृत्यूंची वेगळी नोंद ठेवली जात नाही.
- सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचे नियंत्रण जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
- तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर केंद्रांमध्ये ऑक्सिजन सेंट्रलाइज पाइपलाइन बसवण्याचे काम आरोग्य विभाग करीत आहे.
प्रतिक्रिया -
जिल्ह्यातील मृत्यूंची माहिती तत्काळ पोर्टलवर टाकली जाते. मात्र, पोर्टल अपडेट होण्यासाठी वेळ लागत असल्याने ती उशिरा दिसते. तसेच शासनाला व माध्यमांना दररोज माहिती दिली जाते.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
ही पाहा आकड्यांतील तफावत -
जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यू - ६६०
पोर्टलवरील नोंद - ६२४