साक्री, शिरपूर तालुक्यांमध्ये ‘नामाप्र’ गटच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:32 IST2019-12-17T14:32:14+5:302019-12-17T14:32:53+5:30

फक्त धुळे व शिंदखेडा तालुक्यातच ‘नामाप्र’साठी जागा, या जागेसाठी चुरस निर्माण होणार

There is no 'Nampra' group in Sakri, Shirpur talukas | साक्री, शिरपूर तालुक्यांमध्ये ‘नामाप्र’ गटच नाही

साक्री, शिरपूर तालुक्यांमध्ये ‘नामाप्र’ गटच नाही

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांची संख्या पूर्वीएवढीच असली तरी काही तालुक्यातील गटांची फेररचना झालेली आहे. त्यातच नागरिकांचा मागास प्रवर्ग गटांची संख्याही कायम आहे. मात्र यावेळी साक्री व शिरपूर या दोन तालुक्यांमध्ये नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी एकही गट आरक्षित नाही. तर धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातच नागरिकांचा मागासप्रवर्गाचा गट असल्याने, या दोन्ही तालुक्यात या राखीव जागेवर उमेदवारीसाठी मोठी चुरस राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण ५६ गट असून, त्याचे आरक्षण गेल्यावर्षीच काढण्यात आले होते. यात नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी १५ गट राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
दरम्यान २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी गट आरक्षित होते. मात्र यावेळी होणाऱ्या निवडणुकीसाठी फक्त धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी गट आरक्षित करण्यात आलेले आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात एकही ‘नामाप्र’ गट नाही.
गेल्यावेळी धुळे तालुक्यात केवळ आर्वी हा गट ‘नामाप्र’साठी राखीव होता. मात्र यावेळी धुळे तालुक्यातील १५ पैकी ११ गट हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यात लामकानी,कापडणे, फागणे, नगाव, कुसुंबा, नेर, बोरविहीर, मुकटी, शिरूड, रतनपुरा, बोरकुंड या गटांचा समावेश आहे.
तर शिंदखेडा तालुक्यात गेल्यावेळी विरदेल व मेथी हे दोन गट ‘नामाप्र’साठी राखीव होते. यावेळी मात्र या तालुक्यात ‘नामाप्र’साठी चार गट राखीव आहेत. त्यात बेटावद, नरडाणा, मालपूर आणि खलाणे या गटांचा समावेश आहे.
साक्री, शिरपूरमध्ये
एकही नामप्रगट नाही
दरम्यान गेल्यावेळी साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सात गट हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. त्यात जैताणे, निजामपूर, दहिवेल, चौपाळे, कुडाशी, सामोडे, मालपूर या गटांचा समावेश होता. मात्र यावेळी साक्री तालुक्यातील १७ पैकी एकही गट नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीव नाही.
तीच स्थिती शिरपूर तालुक्याचीही आहे. या तालुक्यात गतवेळी पाच गट नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीव होते. त्यात रोहीणी, दहिवद, वनावल, वाघाडी व हिसाळे गटाचा समावेश होता. मात्र यावेळी होणाºया निवडणुकीसाठी या तालुक्यातही नामप्रसाठी एकही गट राखीव नाही.
दरम्यान ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांना आता धुळे व शिंदखेडा तालुक्यातूनच उमेदवारी करण्याची संधी असल्याने, या दोन्ही तालुक्यांमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा राहण्याची शक्यता आहे. या प्रवर्गातील इच्छुकांना उमेदवारी देतांना सर्वच राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे. त्यातच धुळे तालुक्यात या गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. आता या राखीव जागेवर कोणाकोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे.

Web Title: There is no 'Nampra' group in Sakri, Shirpur talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे