कोरोना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमा कवच नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:20+5:302021-04-30T04:45:20+5:30
धुळे : कोरोना संसर्ग नियंत्रण उपाययोजनेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचारींना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला ...

कोरोना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमा कवच नाहीच
धुळे : कोरोना संसर्ग नियंत्रण उपाययोजनेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचारींना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार, आरोग्य कर्मचारींचा विमा काढला, परंतु कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचा मात्र अजूनही विमा काढलेला नाही. त्यामुळे शिक्षक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत.
काेरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न केलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, ज्या गावात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला, त्या गावात रुग्णांचा सर्व्हे करण्याचे काम तेथील शिक्षकांना दिले जाते. १४ दिवसांच्या आत संपूर्ण गावांचा सर्व्हे करून अहवाल सादर करावयाचा असतो. अशा वेळी शिक्षकांचा पाॅझिटिव्ह रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. आतापर्यंत १ हजारापेक्षा अधिक शिक्षकांनी सेवा बजावली आहे. सध्या जिल्ह्यात १५० शिक्षक सर्व्हे करीत आहेत. आतापर्यंत १४ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांना विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. सरसकट सर्व शिक्षकांचा विमा न काढता, ज्या शिक्षकांना कोरोनाची ड्युटी दिली जाते, त्या शिक्षकांचा विमा काढावा, अशी मागणी आम्ही वर्षभरापासून लावून धरली आहे. शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही.
मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांमध्ये ४ शिक्षक २००५ नंतर नोकरीला लागले असल्याने, त्यांना पेन्शन नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ नाही. या तरुण शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले. जिल्ह्यातील शिक्षकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांना मदत पुरविली, परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.
आमचाही विमा काढा
ज्याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांचा विमा काढला आहे. त्याप्रमाणे, कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचाही विमा काढावा. आमच्या काही सहकाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली.
- बापू पारधी, शिक्षक
गावांमध्ये सर्व्हे करताना शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे जिवाचे बरेवाईट होण्याची शक्यता आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच द्यावे.
- राजेंद्र पाटील, शिक्षक
गावात रुग्णांच्या सर्व्हेसाठी गेलेल्या शिक्षकांना काही वेगळे अनुभवही येतात. इतर व्याधी असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक शिक्षकांकडून औषधोपचारासाठी गोळ्यांची मागणी करतात, परंतु शिक्षक गोळ्या देऊ शकत नाहीत. त्यांचे काम केवळ सर्व्हे करणे आहे, तसेच प्रत्यक्ष कोविडची ड्युटी लावली असेल, तरच विमा लागू करण्याची तरतूद आहे, असे सांगण्यात आले.