धुळे जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:07 PM2020-09-24T12:07:37+5:302020-09-24T12:07:48+5:30

चौकशी समितीचा अहवाल, सर्वसाधारण सभेत मांडला अहवाल

There is no corruption in the development work done under Dhule Zilla Parishad | धुळे जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार नाही

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार नाही

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : आदिवासी शेष फंड व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये झालेल्या गैरकारभार झालेला आहे. या कामांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने चौकशी अहवाल आज सर्वसाधारण सभेपुढे मांडला. समितीने केलेल्या चौकशीत कुठलाही गैरकारभार, भ्रष्टाचार आढळून आलेला नाही. समितीने क्लिन चीट दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच आॅनलाइन झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे होते. यावेळी सभेला उपाध्यक्षा कुसुम निकम, समाजकल्याण सभापती मोगरा पाडवी, शिक्षण सभापती मंगला पाटील, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. हे आॅनलाइन सहभागी झाले होते.
५ आॅगस्ट रोजी गोंदूर शिवारात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद भ्रष्टाचारात बुडालेली असल्याचा आरोप केला होता. आदिवासी शेष फंड १९-२० मध्ये एक कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. करवंद (ता. शिरपूर) येथे ग्रामपंचायत दरवाजाची दुरूस्ती दाखवून त्यासाठी ३ लाख ३१ हजाराचा खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात दुरूस्तीच झालेली नाही. तर करवंद येथेच बागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी २ लाख १३ हजार रूपयांचा खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी बागच नाही. खोटी भिंत दाखवून पैसे लाटले आहेत. करवंद येथेच ३ लाख १८ हजाराचा सभामंडप दाखविण्यात आलेला आहे. मात्र तेथे सभामंडपच नाहीत. अशाप्रकारे जिल्ह्यात खोटी कामे दाखवून पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेतही शिंदखेडा तालुक्यात खोटी कामे दाखविण्यात आली आहे. त्यात ३० लाखांची बिले काढल्याचा त्यांनी आरोप केला होता.
याप्रकरणाची सोनवणे यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने व लेखाधिकारी पी.यु.देवरे यांच्या नियंत्रणाखाली सहा सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.या चौकशी समितीचा अहवाल आजच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. दरम्यान सुनीता सोनवणे यांनी ज्या-ज्या गोष्टींवर आक्षेप घेतला होता, त्याठिकाणची पहाणी समितीने करून अहवाल सादर केला. चौकशीत कुठेही गैरप्रकार झाला नसल्याचे अहवालात नमूद केले असल्याचे रंधे यांनी सांगितले. दरम्यान या अहवालाला सुनीता सोनवणे यांनी विरोध केला.
धावडे आरोग्य
उपकेंद्राचा विषय तहकूब
शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ई निविदेबाबत विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी आक्षेप नोंदविल्याने हा विषय तहकूब ठेवण्यात आलेला आहे. सभेत वाडी खुर्द ते वाघाडी रस्ता, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दर्जान्नत करून त्यांना प्रजिमा दर्जा देणे, मौजे छडवेल, नवापाडा, शिरसोले, रोहोड, सुकापूर, टेंभा, कुडाशी, बसरावळ, दहीवेल ता. साक्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना आॅफग्रीड सोलर पॉवर पॅक ५ किलोवॅट बसविण्याची निविदा स्वीकृत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व इतर अधिकारी सहभागी झाले होते.
एसआयटी चौकशीची मागणी करणार : सोनवणे
आदिवासी शेष फंड व तीर्थक्षेत्र विकासाच्या कामात झालेल्या गैरकारभाराचा अहवाल अवलोकनार्थ मागितला होता.मात्र तो मिळाला नाही. या संदर्भात ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करून एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली जाईल असे सदस्या सुनीता सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: There is no corruption in the development work done under Dhule Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.