क्रीडा स्पर्धाच झाल्या नाहीत, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:36+5:302021-03-25T04:34:36+5:30
धुळे - शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धात खेळलेल्या व प्रावीण्य मिळवलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण दिले जातात. मात्र ...

क्रीडा स्पर्धाच झाल्या नाहीत, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार का ?
धुळे - शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धात खेळलेल्या व प्रावीण्य मिळवलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण दिले जातात. मात्र २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात क्रीडा स्पर्धाच झालेल्या नाहीत त्यामुळे यंदा दहावी व बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार की नाही याबाबत पेच निर्माण झाला आहे. मागील वर्षाच्या प्रावीण्यानुसार क्रीडा गुण देण्यात यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र गुण देण्याबाबत शासनाचे आदेश कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेलले नसल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली.
शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कीड व युवक संचालनालयाने २५ गुण देण्याचा निर्णय आहे. मात्र २०२० मध्ये कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कोणत्याही शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वात आधी क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकले नाहीत. मात्र विद्यार्थी नियमित सराव करतात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात मिळवलेल्या प्रावीण्यावर आधारित गुणांकन करण्यात यावे, अशी मागणी क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी केली आहे. मात्र शासनाचे क्रीडा गुण देण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी गुणांकनासाठीचे प्रस्ताव मागितलेले नाहीत. खेळाडू विद्यार्थ्यांना मात्र गुण मिळण्यापासून मुकावे तर लागणार नाही, अशी भीती सतावते आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र वैयक्तिकरित्या खेळाडू सर्व करीत आहेत. शासनाने खेळाडू विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मागील वर्षीच्या स्पर्धा प्रावीण्यानुसार यावर्षीही सरसकट क्रीडा गुण द्यावे व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.
- डॉ.एल.के. प्रताळे, क्रीडा शिक्षक
चालू शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळा बंद होत्या. तसेच शालेय क्रीडा स्पर्धादेखील झाल्या नाहीत. खेळाडू नियमित सराव करत असतानाही कोरोनामुळे त्यांना व्यासपीठ मिळू शकले नाही. तात्काळ प्रस्ताव मागवावे व मागील वर्षाच्या प्रगतीनुसार क्रीडा गुण द्यावे.
- विनोद धनगर, क्रीडा शिक्षक
दहावी व बारावीतील खेळाडूंच्या प्रतिक्रिया -
मागील शैक्षणिक वर्षाची कामगिरी लक्षात घ्यायला हवी. जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने शाळेकडून स्वीकारावे व खेळाडूंना क्रीडा सवलत गुण देण्यात द्यावे.
रूपाली लोहार
राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू
शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. मात्र तरीही अद्याप गुणांकन प्रस्ताव मागवण्यात आलेले नाहीत. शासनाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना क्रीडा विभागाला द्याव्यात. खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण न देण्याची शासनाची भूमिका अन्यायकारक आहे.
- खेळाडू
गुणदान करण्यासाठी खेळाडूंचे प्रस्ताव मागवावे. कोणता खेळाडू कोणत्या स्पर्धेत सहभागी झाला तसेच कुणाला पदक मिळाले याची सर्व माहिती क्रीडा विभागाकडे असते. त्यामुळे यंदा स्पर्धा झाल्या नसतील तरी मागील स्पर्धांच्या निकालावरून विद्यार्थ्यांना गुण द्यावे.
- ललित गिरासे, राष्ट्रीय खेळाडू
कोरोनामुळे शालेय स्पर्धा झाल्या नाहीत. म्हणूनच विद्यार्थी सहभागी होऊ शकले नाहीत. अन्यथा विद्यार्थ्यानी आपले कौशल्य दाखवले असते. यापूर्वी शालेय स्पर्धांमध्ये पदके प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना ऐन दहावी व बारावीत गुण मिळणार नसतील तर खेळाडूंवर हा अन्याय आहे.
- खेळाडू