बाजारपेठेत चोऱ्या वाढल्या; चोरट्यांचा बंदोबस्त करा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:29+5:302021-08-26T04:38:29+5:30
धुळे - शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. आता चोरटे वर्दळीच्या ठिकाणीही चोऱ्या करू लागले आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, ...

बाजारपेठेत चोऱ्या वाढल्या; चोरट्यांचा बंदोबस्त करा..!
धुळे - शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. आता चोरटे वर्दळीच्या ठिकाणीही चोऱ्या करू लागले आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी बिझनेस ॲण्ड कॉमर्स असोसिएशनने केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी नुकतेच त्याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्री-अपरात्री चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची मजल आता वर्दळीच्या ठिकाणी चोरी करण्यापर्यंत गेली आहे. बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड परिसरातही चोऱ्या वाढल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी रात्री भुसार मालाचे व्यापारी रमेश तलरेजा आपले दुकान बंद करून घरी परतत असताना आग्रा रोडवरील एका दुकानावर उधारी मागण्यासाठी गेले असता काही क्षणांतच चोरट्यांनी त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीतून तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची बॅग पसार केली होती. या धाडसी चोरीमुळे व्यापारीवर्गात खळबळ माजली असून व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, या चोरीचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. तरी सदर चोरीचा त्वरित तपास करून चोरट्यांकडून सर्व रक्कम व्यापाऱ्याला मिळवून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
बँकेच्या बाहेर कॅश डिपॉझिट मशीन बसवा -
बँकेच्या बाहेर कॅश डिपॉझिट मशीन बसवण्याची मागणी संघटनेने केली आहे. बँकांच्या सलग सुट्यांमुळे व्यापारीवर्गाकडे बरीच कॅश जमा होत असते. पण, धुळे शहरात अनेक बँकांनी कॅश डिपॉझिट मशीन बसवलेली नाही. ज्या बँकांनी डिपॉझिट मशीन बसवली होती, ती नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे बँकेत भरणा करता येत नाही. त्यामुळे मशीन बसवून गैरसोय दूर करण्याची मागणी अध्यक्ष कोटेचा, उपाध्यक्ष गोकूळ बधान, सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते, रमेश तलरेजा, विक्की कुकरेजा, जय तलरेजा, घनश्याम खंडेलवाल, रवींंद्र भोकरे, नंदू सोनार, राम रोहिडा यांनी केली आहे.