राऊळ नगरात घराचा दरवाजा तोडून पावणेदोन लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:15 IST2019-07-26T22:14:27+5:302019-07-26T22:15:04+5:30
दोंडाईचा : सोने, चांदीच्या दागिन्यांसह ५० हजाराची रक्कम लांबविली

चोरट्यांनी उघडलेले कपाट व लॉकर.
दोंडाईचा : येथील राऊळ नगरात घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवित चोरट्यांनी लोखंडी कपाटातून दोन तोळे सोने, एक किलो चांदी, चांदीचे दागिने, ५० हजार रुपयांची रोकड असा सुमारे पावणेदोन लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दोंडाईचा येथील राऊळ नगर परिसरातील जयचंद्रा हौसिंग सोसायटीत उदय छात्रालयात कार्यरत असलेले अजितसिंग जगतसिंग गिरासे यांची दोन मजली इमारत आहे. गुरुवारी रात्री आपल्या परिवारासह ते वरच्या मजल्यावर झोपले होते. दरम्यान, खालच्या मजल्यात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटाजवळ पलंग असून त्या पलंगाच्या गादी खालून कपाटाची किल्ली काढली. त्या किल्लीने कपाट उघडून कपाटातील दोन तोळे सोने, एक किलो चांदी व चांदीचे दागिन्यांसह ५० हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे पावणेदोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अजितसिंग गिरासे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी व चौकशी केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.