नांथे सरपंचांच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:07 IST2019-07-26T22:06:50+5:302019-07-26T22:07:05+5:30
होळनांथे परिसरात चोरीचे सत्र : पिंपळे येथेही चोरट्यांनी केला हात साफ

चोरट्यांनी घरातील पेटीचे कुलूप तोडून अस्ताव्यस्त केलेले साहित्य.
होळनांथे : शिरपूर तालुक्यातील होळनांथे परिसरात चोरीचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी रात्री नांथे येथील सरपंचांच्या घरी चोरी केली. येथून चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले. तसेच सरपंचांच्या सासूची पेटी फोडून ऐवज लांबविला. मात्र, सासू बाहेरगावी असल्याने किती ऐवज गेला ते समजू शकले नाही. त्यानंतर गावातीलच एका घराचे कुलूप तोडून तेथून मोबाईल व चांदीचे दागिने लांबविले. त्यानंतर चोरट्यांनी पिंपळे पुनर्वसन या गावाकडे मोर्चा वळविला. तेथे घराचे कुलूप तोडून ९० भार चांदी, ५ ग्रॅम सोन्यासह ६ हजार रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
नांथे ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदनाबाई जयपाल राजपूत यांच्या घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले. तसेच त्यांच्या सासूंच्या खोलीतील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून घराबाहेर फेकून दिली. तसेच घरातील सामान्य अस्ताव्यस्त केले आहे. मात्र, सासू बाहेरगावी असल्याने पेटीतून किती रक्कम अथवा दागिने चोरीला गेले ते समजू शकले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी नांथे गावातीलच गुलाबकोरबाई रामसिंग राजपूत यांच्या खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला.
सर्व परिवार सुरत येथे असल्याने त्या घरात एकट्याच होत्या. त्या झोपलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्यावर गुंगीचे औषध फवारल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून मोबाईल, चांदीचे दागिने लांबविले. त्यानंतर मागच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरटे पसार झाले.
त्यानंतर चोरट्यांनी पिंपळे पुनर्वसन या गावाकडे मोर्चा वळविला. तेथे मनोहर रामदास जाधव हे संपूर्ण परिवारासह बाजूच्या घरात झोपल्याचे हेरुन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातून ९० भार चांदी, ५ ग्रॅम सोने, ६ हजार रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, वाहनाची कागदपत्र लंपास केले. याप्रकरणी नांथे सरपंचांचे पती जयपाल राजपूत व मनोहर रामदास जाधव यांनी थाळनेर पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, होळनांथे परिसरात चोरीचे सत्र सुरुच असून अगोदरच्या घटनांचा तपास लागलेला नसताना पुन्हा एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
नूतन उपनिरीक्षकांना सलामी
थाळनेर पोलीस स्टेशनला नवीन उपनिरीक्षक म्हणून सचिन साळुंखे रुजू झाले आहेत. चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन ठिकाणी चोरी करुन उपनिरीक्षकांना सलामी दिल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु होती. तसेच पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.