धुळ्यातील गणपतीपुलावर लावले तात्पुरते संरक्षण कठडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:36 IST2019-08-21T11:35:32+5:302019-08-21T11:36:30+5:30
लहान पुलाकडे मात्र अजूनही दुर्लक्षच

धुळ्यातील गणपतीपुलावर लावले तात्पुरते संरक्षण कठडे
आॅनलाइन लोकमत
धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील गणपती पुलावरील काही भागातील लोखंडी संरक्षण कठडे तुटून गेले होते. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने, सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या पुलावर तत्काळ तात्पुरते लोखंडी संरक्षण कठडे लावण्यास सुरूवात केली आहे.
४ आॅगस्ट रोजी साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यातील पांझरा नदीच्या उगमस्थळावर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले. रविवारी रात्रीच पांझरा नदीला महापूर आला. नदीवरील तीनही छोटे पूल पाण्याखाली गेले. या महापुरात गणपती पुलावरील अर्ध्या भागावरील दोन्ही बाजुला लावण्यात आलेले संरक्षक कठडे, त्याचबरोबर पथदिव्यांचे खांबही वाहून गेले.
पूर ओसरल्यानंतर गणपती पुलावर संरक्षण कठडे नसतांनाही या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरातील तसेच गावातील तरूण, शाळकरी विद्यार्थी गणपती पुलावर गर्दी करीत असल्याने एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. सुरक्षितेच्यादृष्टीने संबंधित विभागाने कुठलेही उपाय न केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रात्रीच्यावेळी या संरक्षणरहित पुलावरून वाहतूक करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच होते.
गणपती पुलावर ज्या भाागातील लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेले, त्याठिकाणी लाकडी खांब गाडून त्यावर तात्पुरते लोखंडी पाईप लावण्यात आले आहे. केवळ त्यावरच न थांबता हे कठडे रात्रीच्यावेळीही दिसावे म्हणून त्यावर नारंगी रंगाचा कापडही लावण्यात आलेला आहे.
लहानपुलाकडे दुर्लक्ष
गणपती पुलावर तात्पुरते लोखंडी पाईप लावून सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाय तरी करण्यात आले आहे. मात्र ज्या पुलावरून सर्वाधिक वर्दळ असते, त्यापुलावर आतापर्यंत संरक्षक लोखंडी कठडेही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने संभाव्य धोके लक्षात घेऊन या पुलावर संरक्षक भिंतच बांधावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.