धुळ्यातील २४ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:54 IST2020-04-03T21:54:22+5:302020-04-03T21:54:44+5:30
जिल्हा कारागृह : न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी

धुळ्यातील २४ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील कारागृहात सुरक्षिततेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ पहिल्यांदाच सॅनिटायझर आणि मास्कचा वापर होत आहे़ याशिवाय ७ वर्षापर्यंत शिक्षा लागू शकते अशा २४ न्यायाधीन बंदिवानाना न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा कारागृहातील सुत्रांनी दिली़ जिल्हा कारागृहात सध्या १५ नवे बंदिवान दाखल झालेले आहेत़ त्यांना १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे़
कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवरुन दखल घेण्यात आलेली आहे़ त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून गर्दी टाळा, घरी बसा असे वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे़ याची दखल कारागृहातील बंदिवानांसाठी देखील घेण्यात आलेली आहे़ न्यायालयस्तरावर विचार विनिमय होऊन दखल घेण्यात आली़ त्यात ७ वर्षापर्यंत अथवा त्या खालोखाल शिक्षेस पात्र ठरु शकतात अशा बंदिवानांसाठी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे आदेश पारीत केले़ त्यानुसार सद्याच्या स्थितीत २४ न्यायाधीन बंदी आहेत़ त्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली़ सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नाही की संबंधित बंदीवानांचे कोणी नातेवाईक येऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन दोन वाहनाच्या माध्यमातून त्या २४ पुरुष न्यायाधीन बंदिवानांना त्यांच्या घरापर्यंत सोडून देण्यात आले आहे़ त्यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांकडून बंदिवानाना ताब्यात देण्यासंदर्भात आणि शासनाचे आणि कायद्याचे पालन करण्याबाबत लिहून घेण्यात आलेले आहे़ हा तात्पुरता जामीन सुरुवातीला ४५ दिवसांसाठी असणार आहे़ त्यानंतर आवश्यकता भासेल तसे ३० दिवसांप्रमाणे जामीनाची मुदत वाढविण्यात येणार आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने धुळ्यातील कारागृहात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात येत आहे़ २४ जणांना तात्पुरता जामीन मंजूर केल्यानंतर उर्वरीत २७० न्यायाधीन बंदिवान शिल्लक आहेत़ त्यात २५० पुरुष आणि २० महिलांचा समावेश आहे़ यांच्यासह कारागृहातील सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे़ न्यायालयात गर्दी होऊ नये यासाठी कारागृहातूनच सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज होत आहे़ त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी कोणत्याही बंदिवान्याला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही़
न्यायाधीन बंदिवानाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिपा आगे, मंडळ तुरुंगाधिकारी एऩ एम़ कन्नेडवाल, महिला तुरुंगाधिकारी नेहा गुजराथी, वैद्यकीय अधिकारी शिवाजी जायभाये, शिक्षक हेमंत पोतदार आणि अन्य पोलीस महिला व पुरुष कर्मचारी लक्ष ठेवून असतात़