ई-पीक पाहणीसाठी महसूल मित्रांची टीम बनवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:31+5:302021-09-05T04:40:31+5:30

सध्या मालपूरसह परिसरात ई-पीक पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ...

A team of revenue friends should be formed for e-crop inspection | ई-पीक पाहणीसाठी महसूल मित्रांची टीम बनवावी

ई-पीक पाहणीसाठी महसूल मित्रांची टीम बनवावी

सध्या मालपूरसह परिसरात ई-पीक पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. येथील महात्मा फुले सभागृहात या विषयावर स्वतंत्र मार्गदर्शन शिबिर झाले. यानंतर महसूल विभागाच्या यासाठी कुठल्याही उपाययोजना दिसून आल्या नाहीत. याउलट अक्षांश-रेखांश व्यवस्थित आपल्याकडून येणार नाही. परिणामी आपली पीक पाहणीची नोंद होणार नाही व भविष्यात पिकांचे नुकसान झाले तर त्या लाभापासून आपण वंचित राहू, या भीतीपोटी काही शेतकरी १०० रुपये देऊन पीक पाहणीची नोंद करीत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महसूल विभागाने मार्गदर्शन शिबिर घेऊन आपली जबाबदारी संपली, असे समजतात. ते काम शेतकऱ्यांचे असल्याचे सांगून जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

मालपूर शिवारात एकूण एक हजार २९६ खातेदार आहेत. यात पावसाअभावी मूग, उडीद, आदी कडधान्य पीक पाहणी लावण्याआधीच शेतशिवारात नाहीसे झालेले दिसून येत आहेत. यात भुसारमधील बाजरी, ज्वारी पिकाची दुबार पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली व वाऱ्याचा वेग वाढल्याने एकाच मुळावर तग धरून असलेले बाजरीचे पीक हवेतच उडून गेले. ज्वारीलाही अळ्यांनी भस्मसात केले आहे. या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी पीक पाहणीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी धडपड करीत आहेत. यात बऱ्याच शेतकऱ्यांकडे ॲनड्राईड मोबाईलची सुविधा नाही तर काहींकडे साधा मोबाईलही नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत असून, त्यासाठी महसूल विभागाने दखल घेऊन अशा शेतकऱ्यांना आधार द्यावा व शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

काहीजण १०० रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. याची कल्पना वरिष्ठांनादेखील देण्यात आली असून, तक्रार आल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कामासाठी कोणाचीही अधिकृत नेमणूक केलेली नाही. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.

- विशाल गारे, तलाठी, मालपूर, ता. शिंदखेडा

Web Title: A team of revenue friends should be formed for e-crop inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.