विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:26+5:302021-09-08T04:43:26+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी झाला. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॅा. रंधे बोलत होते. जिल्हा ...

विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची
जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी झाला. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॅा. रंधे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर जि. प. उपाध्यक्षा कुसुम निकम, शिक्षण सभापती मंगला पाटील, समाजकल्याण सभापती मोगरा पाडवी, पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर पाटील, जि. प. सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, डायटच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अरूणा नामदेव पवार (अंचाळेतांडा, ता. धुळे), राजेंद्र नानाभाऊ पेंढारे (सालटेक, ता. साक्री), जागृती शिवदास निकम (बोराडी, ता. शिरपूर), सुनील दौलत मोरे (चुडाणे, ता. शिंदखेडा) या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुस्तक व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कारार्थींनी परिवाराच्या सदस्यांसह हा पुरस्कार स्वीकारला.
डॉ. रंधे पुढे म्हणाले की, पुरस्कारार्थी शिक्षकांची जबाबदारी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जे विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत, त्यांना शाळेत दाखल करून त्यांना घडविण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. कोरोनाने सर्व क्षेत्राला फटका बसला तसा शिक्षणक्षेत्रालाही बसलेला आहे. विद्यार्थी शाळेपासून दूर गेला. तो पाटी-पेन्सिल विसरला. या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगात उभे करण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नाव कसे उंचावेल, याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांनी ठरविल्यास विद्यार्थ्यांमध्ये हमखास परिवर्तन होत असते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डायटच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर यांच्यासह पुरस्कारार्थी शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. देवयानी वाघ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
मीदेखील आयपीएस अधिकारी होणार
या कार्यक्रमादरम्यान अंचाळेतांडा येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी तेजल भदाणे हिने आपल्या शिक्षिकेबद्दल मनोगत व्यक्त केले. आमच्या शिक्षिका कशा आदर्श आहेत, हे तिने सांगितले. शिवाय मी एका चालकाची मुलगी असून, मीदेखील आयपीएस अधिकारी होऊन दाखवेन, अशी ग्वाही तिने सभागृहाला दिली. तिच्या या छोटेखानी भाषणाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.