कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सचे गठन करण्याच्या व त्यासाठी मॉडेल ऑपरेशन थिएटरची तातडीने निर्मिती करण्यासाठी व औषधांचा साठा व इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी आमदार फारूक शाह यांनी मंत्रालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी राजेश टोपे यांनी मंत्रालयातील व आरोग्य विभागातील अधिकारी व संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांची मंत्रालयात संयुक्त बैठक बोलाविली.
यासंदर्भात आमदार फारूक शाह यांनी धुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यासाठी लागणारी औषधी व साधनसामग्रीसाठी विचारणा केली होती व या आजारावर येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला होता. त्याच अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी तातडीने राजेश टोपे यांची भेट घेऊन जिल्ह्यात वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस आजारावर कसे नियंत्रण मिळविता येईल यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली व या भेटीत टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या समितीमुळे म्युकरमायकोसिस बाधित रुग्णांना योग्य उपचार व शस्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आता सुलभ होणार आहेत. मंत्रालयातील आयोजित बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे व मंत्री अमित देशमुख, मेडिकल कॉलेजचे सर्व वैद्यकीय अधिकारी व मंत्रालयातील आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.