बालमजुरीच्या निर्मुलनासाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:04 IST2019-11-07T22:04:07+5:302019-11-07T22:04:28+5:30
जिल्हाधिकाºयांचे निर्देश : समाजातील प्रत्येक घटकांनी सक्रिय होण्याचे आवाहन

बालमजुरीच्या निर्मुलनासाठी पुढाकार घ्या
धुळे : बालमजुरीच्या निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी सहभाग नोंदवावा़ शहरातील प्रत्येक व्यावसायिकांकडे तपासणी व धाडसत्र राबवून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केले.
कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निदेर्शानुसार ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे़ या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयुक्त अजिज शेख, सरकारी कामगार अधिकारी किशोर जोशी, महिला व बालकल्याण विभागाचे एम. एम. बागूल, शिक्षण विभागाचे एम. जी. वानखेडे, आरोग्य विभागाचे राजेश बोरसे, गृहरक्षक दलाचे नरेंद्र साळवी आदी उपस्थित होते. येत्या महिनाभरात बाल कामगार प्रथेविरूध्द मोहिमेचा कालबध्द कार्यक्रम राबविण्यात यावा़ यात जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहुलक्षेत्र निश्चित करणे. खासगी आस्थापनेवर मालक व चालकांकडून बाल कामगार न ठेवणेबाबतचे हमीपत्र लिहून घेणे़ बाल कामगार प्रथेविरुध्द जिल्ह्यातील बाजारपेठ क्षेत्रात रॅली घेणे़ सार्वजनिक ठिकाणी या मोहिमेबाबत स्वाक्षरी मोहिम राबविणे. स्थानिक माध्यमांमधून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पथनाट्य प्रबोधन करण्यासह आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हाधिकारी म्हणाले, १९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण एमआयडीसी परिसराची तपासणी करुन १४ वर्षाच्या आतील बालकामगार आढळून आल्यास संबंधित आस्थापनेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभागाने संयुक्तपणे बालकामगारांची शोध मोहीम राबवावी़ शिक्षकांमार्फत त्यांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे. पोलिसांशी समन्वय साधून पथके स्थापन करा़ महानगरपालिका प्रशासनासह औद्योगिक सुरक्षा कार्यालयासही या मोहिमेत सहभागी करुन मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस औद्योगिक विकास महामंडळाचे एम. डी. पटेल, सरकारी कामगार कार्यालयाचे आर. बी. शेळके, बी. एस. दुकळे, डी. यू. बडगुजर, सपना देवरे, जयश्री निकम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.