पावतीप्रमाणे धान्य घ्या, न मिळाल्यास तक्रार करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST2021-05-07T04:37:48+5:302021-05-07T04:37:48+5:30
धुळे : मे महिन्याचे संपूर्ण धान्य मोफत दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे धान्य घ्यावे. दुकानदाराने पावतीप्रमाणे धान्य न दिल्यास ...

पावतीप्रमाणे धान्य घ्या, न मिळाल्यास तक्रार करा!
धुळे : मे महिन्याचे संपूर्ण धान्य मोफत दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे धान्य घ्यावे. दुकानदाराने पावतीप्रमाणे धान्य न दिल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग जास्त प्रमाणावर वाढून रुग्णसंख्या वाढल्याने संपूर्ण देशभरात निर्बंध जारी केले आहेत. महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल ते १५ मेपर्यंत संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत गोरगरीब जनतेची अन्नधान्यावाचून उपासमार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने एप्रिल किंवा मे या एका महिन्यात मोफत अन्नधान्य देण्याचे जाहीर केले आहे. तसेच केंद्र शासनाने माहे मे व जूनमध्ये गतवर्षीप्रमाणे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभारर्थ्यांना मे महिन्यात धुळे जिल्ह्यात मोफत धान्य दिले जाणार आहे. तसेच मागील वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत शिल्लक असलेली डाळसुद्धा माहे मे मध्ये अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांना प्राधान्याने दिली जाणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना वाटून शिल्लक राहिलेली डाळ ही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे.
पंतप्रधान योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मे व जूनसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ प्रति व्यक्ती मोफत दिले जाणार आहे. अंत्योदय कार्डला प्रति कार्ड एक किलो साखर वीस रुपये दराने नेहमीप्रमाणे दिली जाणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करून ई-पाॅस मशीनवर धान्य वितरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे मोफत धान्य प्राप्त करून घ्यावे. तसेच उपरोक्त नमूद प्रमाणे धान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध न झाल्यास संबधित तहसीलदार अथवा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.