मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:20+5:302021-07-15T04:25:20+5:30

धुळे : उजाड रानात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाला बेदम मारहाण करीत मेंढपाळ समाजावर अन्याय करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित ...

Take action against forest workers who beat up shepherds | मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

धुळे : उजाड रानात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाला बेदम मारहाण करीत मेंढपाळ समाजावर अन्याय करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी करीत महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मेंढपाळांनी धुळ्यात वन विभागाच्या कार्यालयाबाहेर नुकतीच निदर्शने केली.

ठेलारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उपवन संरक्षकांना निवेदन दिले. निवेदनात कैफीयत मांडण्यात आली आहे. ७ जुलै रोजी लहू धुडा ठेलारी (रा. बुरझड, ता. धुळे) हे मेंढ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी वन हवालदार नितीन सांगळे, वन शिपाई कोमल जाधव व अन्य तीन कर्मचारी यांनी मेंढ्या चारण्यास मनाई केली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. मेंढपाळ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे पाहून आसपासचे मेंढ्या चारणारे लहानू ठेलारी व हिरामण ठेलारी मदतीला धावून गेले. त्यांना पाहून वन कर्मचाऱ्यांनी पळ काढला. त्यानंतर मेंढपाळांनी लहू ठेलारी यांना प्रथम सानेगिर आरोग्य केंद्रात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मारहाणीत जबर मार लागल्यामुळे नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तत्पूर्वी वन कर्मचाऱ्यांनी लहू ठेलारी यांच्यासह तीन जणांवर खोटा गुन्हा दाखल केला. यापुढे मेंढपाळांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी संबंधित वन कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठेलारी महासंघाचे शिवदास वाघमोडे, नाना पडळकर, ज्ञानेश्वर सुळे, गोविंदा रुपनर, मिठाराम येळे, रमेश येळे, सीताराम येळे, पिंटू भिवरकर आदींनी दिला आहे.

Web Title: Take action against forest workers who beat up shepherds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.