कास्ट्राईब महासंघाची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:34+5:302021-07-16T04:25:34+5:30
धुळे : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बदनामी करणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी निवेदन ...

कास्ट्राईब महासंघाची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
धुळे : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बदनामी करणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे मनपातील बेकायदेशीर पदस्थापना, पदोन्नतीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत पात्र कर्मचाऱ्यांनी महासंघाकडे तक्रार केली होती. त्यामुळे महासंघाने प्रश्न लावून धरला. वेळावेळी निवेदन दिली. याचा परिणाम म्हणून महापालिकेतील बेकायदेशीर कामांना आळा बसला. यामुळे जे कर्मचारी बेकायदेशीर कामे करीत होते, त्यांनी संघटनेबद्दल खोटी तक्रार करून बदनाम करण्याचा प्रकार चालविला आहे. परंतु, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही एक कर्मचारी संघटना असून, सन १९८३ पासून कार्यरत आहे. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे हा महासंघाचा नि:स्वार्थ हेतू आहे. याआधी मनपाच्या म्युनिसिपल फंडातील कर्मचाऱ्यांना कायम पदावर वर्ग करण्यासाठी व राेजंदारी कर्मचाऱ्यांची दरवाढ करण्यासाठी महासंघाने प्रयत्न करून यश मिळवून दिले आहे. ही संघटना केवळ मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी काम करते. असे असताना मनपातील काही कर्मचारी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचत आहेत, असा आरोप निवेदनात केला आहे. तसेच तक्रारीवर महासंघाच्या काही सदस्यांच्या सह्या असल्या तरी सातव्या वेतन आयोगाचे आमिष दाखवून तक्रारीवर त्यांच्या सह्या घेतल्या आहेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन देताना महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी. एम. आखाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.